एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 08:27 IST2025-12-12T08:26:29+5:302025-12-12T08:27:28+5:30
राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
नागपूर - गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली. आगामी महापालिका निवडणुकांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. या चर्चेतून येत्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा वरिष्ठ नेत्यांनी ठाम निर्णय घेतला आहे. त्यात स्थानिक पातळीवर ४-५ नेत्यांच्या समन्वय समिती नेमली जाईल. मुंबई, ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांबाबत वरिष्ठ स्तरावर १०० टक्के महायुती करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून सकारात्मकपणे पुढे गेले पाहिजे असा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक महापालिका निवडणुकीच्या स्तरावर ४-५ प्रमुख नेत्यांची समिती बनवली जाईल. ही समिती महायुतीबाबत प्राथमिक स्वरुपात चर्चा करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. त्यात जनतेच्या हित याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील लोकहित आणि विकासात्मक धोरणातून सकारात्मक संदेश खालच्या स्तरापर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या त्या दृष्टीने ज्या ज्या शक्यता आहे त्याचा विचार महायुतीत करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर करण्याचा निर्णय झाला आहे. महायुती म्हटलं तर त्यात सर्व घटक पक्ष शिंदेसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि इतरही पक्ष आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांची कमिटी तयार करून त्या त्या पातळीवर निर्णय घेण्याचे महायुतीत ठरले आहे असंही रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, सर्वच गोष्टीची चर्चा जाहीरपणे होणे अपेक्षित नाही. परंतु एक गोष्ट सकारात्मकपणे महायुतीबाबतीत निर्णय होणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. २९ महापालिका आहेत, त्या त्याठिकाणी असलेली परिस्थिती रोज बदलत जाते. पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांची जी समिती बनवली आहेत ते जागावाटपाबाबत निर्णय प्रक्रियेची सुरुवात करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरवला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे प्रदीर्घ अनुभव असणारे नेते आहेत. हे तिघेही फार विचार करून महाराष्ट्राला आवश्यक काय आहे याचा विचार करून निर्णय घेत असतात. त्यामुळे यापुढेही ते निर्णय घेतील अशीही माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.