स्थानिक पातळीवर निर्णय अधिकार, मविआच्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:28 IST2025-11-12T12:26:41+5:302025-11-12T12:28:08+5:30
Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर निर्णय अधिकार, मविआच्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या स्थापन
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. ही समिती जो निर्णय घेईल आणि जो फॉर्म्युला देईल त्यावर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब केला जाणार आहे.
आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धव सेनेचे आमदार अनिल परब, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
सपकाळ म्हणाले, आम्ही मागील दोन महत्त्वाच्या निवडणुका एकत्र लढलो आहोत. पुढेही एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय़ बैठकीत घेण्यात आला.
मनसेचा प्रस्ताव नाही
महाविकास आघाडीबरोबर या निवडणुकीत मनसे सोबत लढणार का याबाबत उत्सुकता असताना नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये कुठेही मतभेद असतील किंवा उमेदवारांबाबत चर्चा करायची असेल तर आमच्यात एक समन्वय समिती असायला हवी, याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
निवडणूक लढताना अडचणी आल्या तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्वांनी अधिकार दिले आहेत. स्थानिक पातळीवरील पक्षांचे नेतृत्व यासंदर्भात चर्चा करीत असून या चर्चेतून जो मार्ग निघेल, ते जो फार्म्युला आणतील त्यावर आम्ही तीनही पक्ष शिक्कामोर्तब करू, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.