ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:39 IST2025-10-01T18:30:18+5:302025-10-01T18:39:12+5:30
ST Bus Fare Update: दिवाळीसाठी एसटीने केलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
DCM Eknath Shinde on ST Bus Fare Hike: राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरामध्ये १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या २० दिवसांसाठी भाडेवाढ लागू करण्यात आली. यामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे एक हजार ते ११०० कोटीचा महसूल जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागणार होता. त्यामुळे आता सरकारने एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीच्या तोंडावर १० टक्के भाडेवाढीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. दुसरीकडे अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना एसटीच्या भाडेवाढीने सामान्यांना चिंतेत टाकलं होतं. राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार होतं. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
"पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मी यावेळी अपवाद केला पाहिजे असं सांगितलं. पूरपरस्थितीमुळे १० टक्के भाडेवाढ रद्द करावी असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार आता ते परिपत्रक काढत आहेत. त्यानंतर भाडेवाढ रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरुस्त्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. ही वाद साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता लागू करण्यात येणार होती. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू केली जाणार होती.
यावर्षी धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर रोजी आहे. दरम्यान, शाळांना सुट्टया लवकर पड़त असल्याने आणि काही दिवस आधीच प्रवासी संख्या वाढते. त्यामुळे जादा बसगाड्या १५ ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह त्यांचा परतीचा प्रवास लक्षात घेऊन ५ नोव्हेंबरपर्यंत वाढीव बसगाड्या सुरू ठेवण्यात येणार त्यामुळे या काळासाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार होता.