नुकसानीची पाहणी : नेते पोहोचले बांधावर, मदतीवरून राजकीय ‘गडगडाट’; आता आरोप-प्रत्यारोपांची अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:43 AM2020-10-20T00:43:24+5:302020-10-20T06:51:37+5:30

सगळं केंद्रावर ढकलून नामानिराळं कसं होता? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ठाकरी भाषेत दिलं उत्तर... (Uddhav Thackeray, Devendra Fadnavis)

Damage inspection: Leaders reach at farmer, political thunder over help | नुकसानीची पाहणी : नेते पोहोचले बांधावर, मदतीवरून राजकीय ‘गडगडाट’; आता आरोप-प्रत्यारोपांची अतिवृष्टी

नुकसानीची पाहणी : नेते पोहोचले बांधावर, मदतीवरून राजकीय ‘गडगडाट’; आता आरोप-प्रत्यारोपांची अतिवृष्टी

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत करणार आहे ते सांगा. उगीच टोलवाटोलवी नको आहे. - फडणवीसकोणत्याही संकटप्रसंगी सगळे केंद्र सरकारवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही - फडणवीसमाझ्यावर टीका करणाऱ्यांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावे - उद्धव ठाकरे

बारामती : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत करणार आहे ते सांगा. उगीच टोलवाटोलवी नको आहे. कोणत्याही संकटप्रसंगी सगळे केंद्र सरकारवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही. तुमची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 

बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची सोमवारी फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री होते. त्यांना केंद्राकडून मदत कशी मिळते हे माहिती आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे गेल्यानंतर  गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसतात. त्यानंतर मदतीची भूमिका निश्चित करतात. केंद्र सरकार निश्चित मदत करेल, परंतु सोयीस्कर राजकीय भूमिका कोणत्याच नेत्यांनी  घेऊ नये. लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौऱ्यांदरम्यान थिल्लर वक्तव्ये करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशी टीकाही  फडवणीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले, मी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना  पावसाने झालेल्या नुकसानीनंतर दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याच्या वतीने मदत सुरु केली. अतिवृष्टीनंतर पाच दिवसात  पंचनामे पूर्ण केले. जेथे पंचनामे होऊ शकले नाहीत, तेथे मोबाईलवर फोटो काढून टाकला तरी तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरला होता. आता तर शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ व्यवस्था व्हायला हवी, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

प्रत्येक जबाबदारी केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचे -
प्रत्येक जबाबदारी केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे व्हायचे, आपले जणू काही कामच नाही, ही  प्रवृत्ती  योग्य नाही. पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, ती पार पाडत तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करून मदतीची ग्वाही दिली आहे, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्राकडे मदत मागितली म्हणून बिघडले कुठे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्तर -

केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचे नाही. राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्र सरकारने पक्षपात करू नये. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी बिहारमध्ये प्रचाराला जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन मदत मागावी. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचे काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते आम्ही करणार आहोत.  मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडत नाहीत अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता, घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात काम करू, असा टोला ठाकरेंनी विरोधकांना लगावला.  

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे  यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश  वाटप करण्यात आले.

भरपाईची काळजी करु नका, जीव सांभाळा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  अक्कलकोट तालुक्याचा दौरा करुन पाहणी केली. रामपूर या गावी ग्रामस्थांशी संवाद साधला.  नुकसान भरपाईची काळजी करु नका, स्वत:चा जीव सांभाळा, अशी ग्रामस्थांना त्यांनी विनंती केली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे मदत मागण्यात गैर काय? शेतकऱ्याच्या डोळ्यांत 
आज पाणी आहे. त्यांनी काय बोलावे, मागावे यापेक्षा त्यांचे दु:ख ओळखून आम्ही त्यांना मदत करणार आहोत. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: Damage inspection: Leaders reach at farmer, political thunder over help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.