‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:09 IST2025-07-04T19:07:24+5:302025-07-04T19:09:36+5:30

Shiv Sena Shinde Group News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला महायुतीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

criticism over jai gujarat shiv sena shinde group leaders showed video of uddhav thackeray | ‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर

‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर

Shiv Sena Shinde Group News: पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु, या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते उत्तर देत असून, उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओच आता शेअर करण्यात आला आहे.

फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. ⁠हा पक्षाचा किंवा सरकारी कार्यक्रम होता का? हा गुजराथी समाजाचा कार्यक्रम होता. एकनाथ शिंदे हे आधी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणाले आणि जय गुजरात, असे म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे. आमचे एक संमेलन ८ ते १० वर्षांपूर्वी कर्नाटकला होते. तिथे भाषण संपवताना शरद पवार यांनीही जय कर्नाटक अशी घोषणा दिली होती. म्हणजे शरद पवार यांचे कर्नाटकवर प्रेम आहे का? ते महाराष्ट्रातील आहेत, महाराष्ट्राबाबत त्यांना प्रेम आहे. कोणत्याही गोष्टीचे राजकीय भांडवल करताना, एखाद्या व्यक्तीला बदनाम करताना विकासात्मक दृष्ट्‍या करू. काही लोक गेल्या तीन वर्षांच्या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. त्यामुळेच असे मुद्दे काढत असतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला

तसेच उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे ‘आप आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात’ म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील, म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न, असे शीतल म्हात्रे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, गुजराती समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे 'जय गुजरात' म्हणाले. त्यावरून एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रावरील आणि मराठी माणसावरील प्रेम कमी झाले आणि गुजरात वर जास्त प्रेम आहे, असा संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावले आणि संपूर्ण भारताला स्वतंत्र केले. दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचे काम मराठी माणसाने केले. एवढा संकुचित विचार कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: criticism over jai gujarat shiv sena shinde group leaders showed video of uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.