नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:35 IST2025-12-24T16:34:18+5:302025-12-24T16:35:06+5:30
Non-Bailable Warrant Against Nitesh Rane: भाजपाचे कणकवलीचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे, तसेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना आज कोर्टाने मोठा दणका दिला आहे. या तिन्ही नेत्यांविरोधात हे अजामिनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे.

नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
भाजपाचे कणकवलीचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे, तसेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना आज कोर्टाने मोठा दणका दिला आहे. २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत कुडाळ येथील न्यायालयाने या तिन्ही नेत्यांविरोधात हे अजामिनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे.
२६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे झालेल्या ओबीसींच्या आंदोलनात नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे भाजपा नेते सहभागी झाले होते. या आंदोलनाप्रकरणी नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह निलेश राणे आणि राजन तेली यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी आज कुडाळ येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीला निलेश राणे आणि राजन तेली हे हजर राहिले होते. तर नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यासह पाच इतर आरोपी गैरहजर राहिले. यावेळी नितेश राणे यांच्या वकिलाने दाखल केलेला विनंती अर्ज फेटाळून लावत कोर्टाने थेट त्यांच्याविरोधात वॉरंट बजावले. तसेच नितेश राणे हे या प्रकरणी कोर्टाने दिलेल्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरोधात थेट अटक वॉरंटही बजावले आहे.
जून २०२१ मध्ये जेव्हा हे ओबीसी आंदोलन झाले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात जमाव जमवण्यात आला होता. त्यावेळी या आंदोलनात सहभागी असलेल्या नितेश राणेंसह इतर नेत्यांना पोलिसांनी अटकही केली होती. तसेच तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. त्याचवेळी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी संविधान बचाव आंदोलनही केलं होतं.