हृदयद्रावक! गळफास घेतलेल्या युगुलाचे लग्न लावून केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:23 IST2021-08-02T13:13:32+5:302021-08-02T13:23:06+5:30
Love News: मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. पण त्याची घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती. इथे जातीचा विषय नव्हता पण...

हृदयद्रावक! गळफास घेतलेल्या युगुलाचे लग्न लावून केले अंत्यसंस्कार
भडगाव (जि. जळगाव) : मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. पण त्याची घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती. इथे जातीचा विषय नव्हता पण बोलण्याचे धाडस न दाखवल्याने मुलासाठी वधू संशोधन सुरू झाले तेव्हा आता आपले लग्न होणार नाही, या विचाराने दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कळली तेव्हा दोन्ही कुटुंबीयांनी या दोघांच्या प्रेमाला मूकसंमती दिली आणि अंत्यविधी करण्यापूर्वी दोघांचे लग्न लावून त्यांच्या आत्म्याची शांती केली. वाडे (ता. भडगाव) येथे रविवारी हा प्रकार घडला.
मुकेश कैलास सोनवणे (२२) व नेहा बापू ठाकरे (१९) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मुकेश हा वाडे गावातच तर नेहा गावाबाहेरच्या वस्तीत मामाकडे राहत होती. पाळत ता. मालेगाव येथे राहणारे तिचे आई-वडीलही गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वीच वाडे येथे रहायला आले होते.
या दोघांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यात मुकेश याला पाहण्यासाठी रविवारीच पाहुणे येणार होते. त्यामुळे आपले लग्न होणार नाही, या समजातून रविवारी सकाळी दोघांनी वाडे येथे माध्यमिक विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या लोखंडी आसारीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
वाडे येथील पोलीस पाटील अरविंद फकिरा पाटील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. वाडे येथे दुपारी २.४० वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मुकेश व नेहा यांचे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यात आले. यावेळी दोघाच्या नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. गावात वातावरण सुन्न झाले होते.
दोघांचेही आईवडील प्रेमाबाबत अनभिज्ञ
दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे आम्हाला माहिती नव्हते, अशी माहिती दोघांच्याही आईवडिलांनी पोलिसांना दिली. मुकेश याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण तर नेहा हिच्या पश्चातही आई-वडील, भाऊ,बहीण असा परिवार आहे. मयत प्रेमी युगुल हे एकाच समाजाचे आहेत.
दोघांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम आहे. मोलमजुरी करुन ते संसार चालवितात. या घटनेने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसलाआहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाडे येथे पोहचत पंचनामा केला. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.