विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढणार!

By Admin | Updated: June 2, 2015 01:15 IST2015-06-02T01:15:58+5:302015-06-02T01:15:58+5:30

व-हाडात सर्वाधिक क्षेत्र वाढण्याची शक्यता!

Cotton sector will grow in Vidarbha region | विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढणार!

विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढणार!

अकोला : यावर्षी पाऊस वेळेवर पण सरासरी कमी होणार असल्याचे भाकीत असल्याने सोयाबीन बियाण्यांसंबंधी शेतकर्‍यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर शेकडो शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पीक पेरणीसाठीचे नियोजन केले असून, विदर्भात यावर्षी एक ते दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यामुळे हे क्षेत्र ३७ लाख हेक्टरपर्यंंत खाली घसरले आहे. प्रामुख्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले असून, त्यांनी सोयाबीन या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच गतवर्षी राज्यात कधी नव्हे एवढे म्हणजेच ३१.६२ लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्रात भर पडली होती. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची वाढ कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर एवढी झाली. गेल्यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली होती. तथापि गेल्यावर्षी झालेला कमी पाऊस आणि काढणीच्यावेळी झालेला अवकाळी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादन घटल्याने यावर्षी प्रमाणित सोयाबीन बियाणे मिळेल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. दरम्यान, अप्रमाणित बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असल्याने ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले, त्यांना या बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी लागणार आहे. यामुळेच शेतकरी कापूस पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात कापसाचे क्षेत्र हे अठरा लाख हेक्टर होते, ते घसरू न कमी झाले होते. यामध्ये यावर्षी पाच ते सात लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाचा पेरा वाढणार असला तरी त्यासाठीदेखील ३0 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची गरज आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, ज्वारीची पेरणी ही मृग नक्षत्रातच होणे अपेक्षित असते; परंतु पाऊस वेळेवर येणे आवश्यक आहे. पावसाने विलंब केल्यास गतवर्षाचा अनुभव बघता, यावर्षी या क्षेत्रावर कापूस पेरा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज अकोलास्थित कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. टी.एच. राठोड यांनी वर्तविला.

Web Title: Cotton sector will grow in Vidarbha region