मतदार यादीतील चुका, चुकीच्या प्रभागात नाव असल्यास दुरुस्त करा; राज्य निवडणूक आयोगाचे सर्व महापालिकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:09 IST2025-11-26T11:06:58+5:302025-11-26T11:09:29+5:30
दुबार मतदारांविरोधात मतदान केंद्रनिहाय कारवाई मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी पूर्ण करण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत

मतदार यादीतील चुका, चुकीच्या प्रभागात नाव असल्यास दुरुस्त करा; राज्य निवडणूक आयोगाचे सर्व महापालिकांना आदेश
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकांनी जारी केलेल्या प्रारूप मतदार यादीत चुका असल्यास त्या दुरुस्त करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
काही महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. महापालिकांकडेही अशा तक्रारी येऊ शकतात. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत किंवा कसे याची तपासणी करण्यात यावी आणि जर असे मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असतील तर त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करून अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे स्पष्ट आदेश आयोगाने दिले आहेत.
दुबार मतदारांवर तातडीने कारवाई
दुबार मतदारांविरोधात मतदान केंद्रनिहाय कारवाई मतदार यादी अंतिम करण्यापूर्वी पूर्ण करण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत. मतदान केंद्रवार प्रकाशित होणाऱ्या यादीत दुबार नावे स्पष्टपणे चिन्हांकित असावीत, असेही आदेशात म्हटले आहे.
अहवालावर विसंबून राहू नका, खातरजमा करा
विशेष म्हणजे असे करताना केवळ बीएलओ अथवा तत्सम कर्मचाऱ्यांनी केलेल्या अहवालावर विसंबून न राहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची खातरजमा करून मतदार यादी सुधारित करण्याची कार्यवाही करावी. दररोज प्राप्त होणाऱ्या हरकतींची तत्काळ तपासणी करून शक्यतो त्याच दिवशी अथवा दुसऱ्याच दिवशी त्याचा निपटारा करावा, अशी सूचनाही आदेशात देण्यात आली आहे.