Coronavirus : उजळणी करा, ताण घेऊ नका; मानसिक तणावाखाली असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:08 IST2020-03-24T00:25:42+5:302020-03-24T06:08:24+5:30
coronavirus : विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात.

Coronavirus : उजळणी करा, ताण घेऊ नका; मानसिक तणावाखाली असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुंबई : कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता शालेय शिक्षण विभागाकडून दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. एका पेपरसाठी ३१ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. मात्रर् ंविद्यार्थ्यांनी राहिलेल्या परीक्षेचा ताण न घेता पुढील महत्त्वाच्या परीक्षांची माहिती घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यास वेळ द्यावा, असे करिअर मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सुचविले आहे.
आपत्कालीन परिस्थितीतही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेटाने, परिश्रमपूर्वक सुरू ठेवल्या होत्या. विविध पालक संघटना आणि शाळांकडून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केल्यानंतरच या परीक्षांनाही स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती. या कारणास्तव अखेर एक पेपर बाकी असताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षेला स्थगिती देऊन पुढील निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र दहावीचे वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष, आणि ही परीक्षा झाली की विद्यार्थ्यांचा मानसिक ताण आपोआप कमी होतो. मात्र लांबणीवर पडलेल्या पेपरचा अभ्यास किती दिवस आणि कसा करणार? इतके दिवस तोच अभ्यास सोडून इतर काहीच करता येणार नाही. यामुळे उगीचच अडकून पडलो, अशा प्रतिक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांकडून येत आहेत.
विद्यार्थ्यांना दहावीच्या एका पेपरची धाकधूक असणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य राखून उजळणी करावी म्हणजे त्या पेपरची भीती उरणार नाही. पालक यामध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात. ते विविध उपक्रमातून सहज विद्यार्थ्यांची उजळणी करून घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना खास वेळ काढून अभ्यास करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना त्याचा ताणही वाटणार नाही. शिवाय ते इतर विषयांत आपला सकारात्मक वेळ गुंतवू शकतात, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ शीला साळवे यांनी दिला.
या काळात पेपरचा मानसिक ताण घेण्याऐवजी पुढील आयुष्यात आपण तयारी करत असलेल्या क्षेत्राविषयी माहिती घेण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा, असे मत राजश्री मोरे या शिक्षिकेने व्यक्त केले.