coronavirus: Reduces the risk of coronavirus in severe tuberculosis patients, experts say | coronavirus: क्षयाच्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी , तज्ज्ञांचे मत

coronavirus: क्षयाच्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी , तज्ज्ञांचे मत

मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गाचा अधिक धोका असल्याचे म्हटले जाते आहे. मात्र क्षयाच्या गंभीर रुग्णांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी असल्याचे श्वसनविकारतज्ज्ञांचे मत आहे. शिवडी क्षय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. ललीतकुमार आनंदे यांनी याविषयी निरीक्षण मांडले आहे. क्षयरोग आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याचे आढळले आहे.
तोंडातील उडालेल्या बिंदुकांच्या संपर्कातून टीबी होऊ शकतो, अशाच प्रकारे कोरोना संसर्गाची बाधा होत असल्याचेही समोर आले आहे. याबाबत डॉ. आनंदे यांनी सांगितले की, अ‍ॅक्टिव्ह पीटीबी टीबी झालेल्या गंभीर रुग्णांना कोरोनाचा धोका कमी आहे. अ‍ॅक्टिव्ह पीटीबी रुग्णांना कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संपर्काचा परिणाम होऊ शकत नाही. कोरोना संसर्गामुळे शिवडीतील टीबी रूग्णालयात दाखल झालेल्या पीटीबी रुग्णांच्या मृत्यू दरात वाढ होईल, अशी भीती होती. एकूण दाखल रुग्णांपैकी दररोज सुमारे १०० ते २०० पर्यंत रुग्णांचा मृत्यू होईल, अशी भीतीही व्यक्त होत होती. मायक्रोबॅक्टीरियम म्हणजेच क्षय कोरोना विषाणूला थारा देत नाही. त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंची लागण होताना दिसत नाही. टीबी रुग्णालयात ४५० हून अधिक रुग्ण आहेत. कोरोना चाचणीत केवळ एक एक्सडीआर टीबी प्रकरणातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला.
क्षयग्रस्त इम्युनोकोम्प्रमाइज्ड असतात, तसेच त्यांच्या फुप्फुसाचे अर्धे किंवा पूर्ण नुकसान झालेले असते. त्यामुळे या रुग्णांना कोरोना विषाणूंचा फटका बसेल असे वाटत होते. मात्र असे काहीही झाले नसल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. योगेश पिंगळे यांनी सांगितले. क्षय रुग्णांना विलगीकरण किंवा संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्यावरही विलगीकरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार करण्यात येतात.

संशोधनाची गरज
क्षय रुग्णांना जी औषधे दिली जातात त्यांचा हा परिणाम असण्याची शक्यता डॉ. आनंदे यांनी व्यक्त केली. क्षयामुळे रुग्णाच्या श्वसनमार्गामधील सिलिया खराब होतो. त्यामुळे तो अशा रुग्णाच्या आत शिरलेल्या विषाणूला तेथे थांबू देत नाही हेदेखील एक कारण असण्याची शक्यता आहे. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Reduces the risk of coronavirus in severe tuberculosis patients, experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.