CoronaVirus News: मुंबईतील आणखी चौघा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 17:37 IST2020-06-13T16:42:03+5:302020-06-13T17:37:09+5:30
CoronaVirus News: कोविड-19च्या संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलिसांतील 23 तर राज्यभरातील 37 पोलिसांचा बळी गेला आहे.

CoronaVirus News: मुंबईतील आणखी चौघा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई -राज्याप्रमाणे मुंबई पोलीस दलातही कोरोनाचे थैमान सुरूच असून, गेल्या 24 तासांत मुंबईतील चौघा पोलिसांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मृत्यूबरोबरची त्यांची झुंज अपयशी ठरली. चोघे अंमलदार अनुक्रमे दिंडोशी, बोरिवली, वाकोला पोलीस ठाणे आणि संरक्षण विभागात ते कार्यरत होते. अल्पावधीत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पोलीस वर्तुळ आणि त्याच्या कुटुंबीयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत मुंबई पोलिसांतील 26तर राज्यभरातील 40 पोलिसांचा बळी गेला आहे. दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याचे चार जूनला स्पष्ट झाले. तेव्हापासून त्यांच्यावर सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आठवडाभर त्याची प्रकृती स्थिर होती. शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याचे निधन झाले. बोरिवली पोलीस ठाण्यात नियुक्तीला झालेल्या 42 वर्षांच्या पोलीस हवालदाराला बंदोबस्ताच्या ड्युटीवेळी कोरोनाबाधिताशी संपर्क झाल्याने लागण होऊन पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्याच्यावर नालासोपारा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याचे रात्री निधन झाले. वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसावर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे शनिवारी निधन झाले. तर संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका अंमलदारावर आठवड्याभरापासून उपचार सुरू होते.
राज्य पोलीस दलात आतापर्यंत 197अधिकारी व 1211 अंमलदार असे एकूण 1408 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक अधिकारी व अंमलदार हे मुंबई पोलीस दलातील आहेत. कोरोनाबाधित पोलिसांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यू झालेल्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलीस दलात या विषाणूबद्दलची भीती कायम राहिली आहे.
हेही वाचा
'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड
CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित
CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन
CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही