CoronaVirus News: Shortage of Remedesivir injections in the state | CoronaVirus News: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा; नवा साठा १७ एप्रिलपर्यंत मिळणा

CoronaVirus News: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा; नवा साठा १७ एप्रिलपर्यंत मिळणा

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे बोललं जात आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांत रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, अंबरनाथ, पुणे, नांदेड , लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि नाशिकमध्ये पुन्हा रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रुग्ण, डॉक्टर, हॉस्पिटलसह सरकारलाही या इंजेक्शनसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. राज्यात सध्या ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून नवीन साठा १७ एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार आहे, यावेळी ७० हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

काही खासगी डॉक्टर रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, इतरांसाठी या इंजेक्शनचा वापर करण्यात येऊ नये,  अशा सूचनाही यासंदर्भात  संबंधित सर्व डॉक्टरांना देण्यात येणार आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

किंमत नियंत्रणात; १,२०० ते १,८०० रुपयांना उपलब्ध
मुंबई : राज्यात काेरोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने कोरोनावर गुणकारी ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीरच्या किमती कमी करुन नियंत्रणात आणल्या आहेत. ४,५०० ते ५,४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १,२०० ते १,८०० रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किंमती नियंत्रण आदेश २०१३’अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने एपिडेमिक अ‍ॅक्ट १८७९ तसेच अन्य कायद्यांचा अवलंब करून रेमडेसिवीर इंजेक्शन मास्क, सिटी स्कॅन चाचणी, कोरोना चाचणी तसेच रुग्णालयातील बेडचे व उपचारांचे दर नियंत्रित केले आहेत.

...तर तक्रार करा
ऑक्सिजन, रेमडेसिवीर रुग्णास मिळत नसल्यास अथवा काळाबाजार होत असल्यास त्याची माहिती संबंधित अन्न व औषध कार्यालयाच्या जिल्हा कार्यालयास किंवा प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. त्यांना औषध मिळवून देण्यास निश्चित मदत केली जाणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Shortage of Remedesivir injections in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.