यंदा गरबा दांडिया नाही; राज्य सरकारकडून नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:51 IST2020-09-29T17:49:11+5:302020-09-29T17:51:17+5:30
नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

यंदा गरबा दांडिया नाही; राज्य सरकारकडून नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर
मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवातील मूर्ती ४ फूटांपेक्षा तर घरगुती मूर्ती २ फूटांपेक्षा मोठी नसावी, असा नियम घालून देण्यात आला आहे. याशिवाय यंदा देवीची मिरवणूक काढता येणार नाही. मंडपांमध्ये सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यंदा गरबा, दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचं संकट लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचं पालन करावं, 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या सरकारच्या मोहिमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर पाळलं जाणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनामुळे देशावर ओढवलेल्या संकटात अनलॉकचा चौथा टप्पा ३० सप्टेंबरला संपणार आहे. 1 ऑक्टोबरपासून अनलॉक-5 सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अनलॉक-५ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सवलती संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना आज जारी करण्याची शक्यता आहे.