CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद; सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 07:32 PM2021-04-07T19:32:30+5:302021-04-07T19:47:25+5:30

CoronaVirus News : राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

CoronaVirus News: Positive response of trade associations to CM's call; Government is not against traders - Uddhav Thackeray | CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद; सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - उद्धव ठाकरे

CoronaVirus News : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला व्यापारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद; सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्दे'धारावी पॅटर्नचे जगभर कौतुक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे.'

मुंबई : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, असे सांगतानाच मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही आज येथे केले. (CoronaVirus News : Government is not against traders - CM Uddhav Thackeray)

राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या संवाद प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी सहभागी झाले. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण आपली लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे. 

व्यापाऱ्यांनीच दिलेल्या माहिती नुसार मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे - संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसऱा हल्लाही आपल्यावरही झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणे जाणेही मुंबईत मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापुर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते. खरेतर, दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापुर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतुक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे. 

("25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती )

मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या सूचनांचा स्वीकार केला, तर कामगार- कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड-चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या येता-जातानाची काळजी घ्या. यात एकमेकाची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. नक्कीच या संकटातून बाहेर पडू. पण गेल्यावेळी जी चूक केली, ती पुन्हा करू नये. कोरोना पूर्ण जात नाही. तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत. शांतपणे, कुठलाही धोका न पत्करता कोणत्या उपाय योजना करता येतील, याचा विचार करू. सगळ्याना विश्वासात घेऊन पुढे जायचे आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणे मांडले. या सर्वांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या हातात-हात घालून काम करू. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापाऱ्यांचे काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमही काटेकोर पालन होईल, असे उपाय योजना करण्याची मागणी करतानाच, ब्रेक दि चेनला सहकार्य करू असे सांगितले. यावेळी दिपेन अग्रवाल, जयकृष्ण पाठक, रसेश दोशी, महेश बखाई, निमित शहा, मितेश मोदी, धीरज कोठारी, राजेश शहा, राजेंद्र बठिया, धैर्यशील पाटील, दिलीप कुंभोजकर, संतोष मंडलेचा, वालचंद संचेती आदी उपस्थित होते. मुख्य सचिव कुंटे यांनी प्रास्ताविक केले व राज्यातील कोरोना नियमावलीच्या अनुषंगाने माहिती दिली. 

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास म्हणाले, फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर २०२० मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस बारा लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते. टास्क फोर्सचे डॉ. जोशी म्हणाले, राज्यात गंभीर परिस्थिती. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरूण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील.

Web Title: CoronaVirus News: Positive response of trade associations to CM's call; Government is not against traders - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.