Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 13:35 IST2021-03-30T13:31:35+5:302021-03-30T13:35:49+5:30
लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत

Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे
एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. दरम्यान, लॉकडाऊनच्या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होऊ लागला आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील यावरून सरकारवर टीका केली.
"लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होतेय हे वैज्ञानिकदृष्ट्या कुठेही सिद्ध झालेलं नाही. लोकांचं जे नुकसान होईल ते सरकार भरून देणार आहे का? जर माझा नोकरी धंदा गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आम्हाला बारमधून तीन लाख रुपये कमिशन येत नाही," असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारला टोला लगावला. जेव्हा तुम्ही कोरोनाची चाचणी करता तेव्हा तो कोणता स्ट्रेन आहे हेदेखील सिद्ध झालेलं नाही. साधा सर्दी खोकला असला तरी तो कोरोना पॉझिटिव्ह येतो. लोकं आता लॉकडाऊन मानायला तयार होणार नाहीत हे लक्षात घ्यावं. हा मुर्खपणा, आतातायीपणा सरकारनं केला तर लोकं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत," असंही ते म्हणाले.
... तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही
"लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही," असं विधान राजेश टोपे यांनी सोमवारी केलं होतं. महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतोय असे म्हणावे लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. याशिवाय, कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
ई आयसीयूवर भर - आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: छोट्या श्रांत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचं आव्हान असून ई आयसीयूवर भर देण्यासाठी पावलं उचलण्यात येतील असं सांगितलं. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असं सांगितलं. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.