coronavirus: ‘लोकमत ऑपरेशन मास्क’ : एकाच मास्कचे १४ जिल्ह्यांमध्ये १४ दर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:16 AM2020-07-08T06:16:33+5:302020-07-08T06:17:12+5:30

राज्यभरातील पाहणीत धक्कादायक वास्तव उघड, एन ९५ मास्क सिंधुदुर्गात २३० रुपयांना तर नगरमध्ये घेतला गेला २२० रुपयांना

coronavirus: ‘Lokmat Operation Mask’: 14 rates for a single mask in 14 districts! | coronavirus: ‘लोकमत ऑपरेशन मास्क’ : एकाच मास्कचे १४ जिल्ह्यांमध्ये १४ दर !

coronavirus: ‘लोकमत ऑपरेशन मास्क’ : एकाच मास्कचे १४ जिल्ह्यांमध्ये १४ दर !

googlenewsNext

मुंबई : एका एन ९५ मास्कच्या दराचे ‘लोकमत’ने आॅपरेशन हाती घेतले. गेल्याच वर्षी १७ रुपये ३३ पैशांना विकत घेतलेला मास्क आता वेगवेगळ््या १४ जिल्ह्यांमध्ये १४ वेगवेगळ्या दराने खरेदी झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक दर २३० रुपये आहे तर सगळ््यात कमी दर ४२ रुपये आहे. तर अवघ्या ८४ पैशांना घेतला गेलेला ट्रिपल लेअर मास्क सातारा जिल्हा प्रशासनाने ३ रूपये २० पैशांना घेतला आहे. ‘लोकमत आॅपरेशन मास्क’ अंतर्गत राज्यभरात केलेल्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड झाले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या मास्कच्या खरेदीत हाफकिनची किंमत बेस १७.३३ धरली तर या खरेदीत जिल्हा परिषदेचे सुमारे २८ कोटी रुपये जादा गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते, याची चौकशी होण्याची गरज आहे. याबद्दल विचारल्यावर अधिक माहिती देण्यास आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी नकार दिला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याशी वारंवार संपर्क साधला पण तो झाला नाही.

जिल्हा परिषदेने आतापर्यंत सीपीआर प्रशासनाला सुमारे ४७,१५० एन ९५ मास्क दिले असून त्यापैकी २,५७८ शिल्लक आहेत. शासकीय वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याचा ठेका दिलेल्या हाफकिन या कंपनीकडून कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयासाठी सुमारे ५० हजार ट्रिपल लेयर मास्क प्रती ८ रुपये ८७ पैसे या दराने खरेदी केल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी दिली.

औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) प्रति ४२ रुपये एक या दराने मार्चपासून तीन वेळा प्रत्येकी १० हजार एन- ९५ मास्कची खरेदी केली. तर प्रति १५ रुपये एक या दराने मार्च महिन्यात १९ हजार ५०० ट्रिपल लेअर मास्कची खरेदी केली. त्यानंतर या मास्कची खरेदी केलेली नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. मात्र महापालिकेने हेच मास्क १५० रुपयांना एक असे घेतले आहेत !
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने मार्चमध्ये सुमारे ३ हजार एन ९५ मास्क व सुमारे ७० हजार ट्रिपल लेअर मास्कची खरेदी केली होती़ एका एन ९५ मास्कसाठी २२० ते २३० रुपये मोजावे लागले. ट्रिपल लेअर मास्कच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या खरेदीत एका मास्कसाठी १८ रुपये मोजले. विनाटेंडर खरेदी झाली होती़ नंतर एन ९५ मास्कसाठी टेंडर प्रक्रिया राबविली. मात्र, राज्य व केंद्र सरकारकडून पुरवठा सुरू झाला. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रिपल लेअर मास्क सुरुवातीला १८ रुपये दराने सुमारे २५ हजार खरेदी केले होते़ ते पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण आरोग्य केंद्र, महानगरपालिका, छावणी परिषद अशा विभागांना दिले. त्यानंतर पुन्हा १० रुपयाने सुमारे ४५ हजार मास्कची खरेदी केली.

नाशिकमध्ये १२ लाखांची मास्क खरेदी

नाशिक जिल्हा प्रशासनाने मुंबई महापालिकेच्या रेट कॉन्ट्रॅक्टनुसार दहा हजार एन ९५ मास्क खरेदी केले. त्यावेळी हे मास्क ४२ रुपये प्रति नग या दराने ४२ लाख रुपये किमतीचे झाले. भविष्यासाठीची तरतूद म्हणून पुन्हा मास्क खरेदी करण्यासाठी प्रशासनाने विचारणा केली असता १४५ रुपये प्रति एक असा दर आला. त्यावर प्रशासनाने दर कमी करा, असे सांगितले.

तेव्हा तो १३५ रुपये होईल, असे संबंधित कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र ही रक्कमदेखील खूप वाटत असल्याने नाशिकच्या प्रशासनाने पुढील खरेदीचा निर्णय घेतलेला नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयाने एप्रिल महिन्यातच १२ लाख १८ हजार ७५० रुपयांचे ट्रिपल लेअर मास्क खरेदी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालय :
प्रति २३० रुपये एक या दराने एन ९५ मास्कची खरेदी केली आहे. नंतर जिल्ह्यात हापकीनकडून आठ हजार एन ९५ मास्क आले. तर १४.८५ रुपये दराने मार्च महिन्यापासून ५० हजार ट्रिपल लेअर मास्कची तीन वेळा खरेदी करण्यात आली आहे. त्याची एकदाही निविदा काढण्यात आली नाही. सर्व खरेदी कोटेशन काढून करण्यात आल्याचे सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर म्हणाले.

जळगाव जिल्हा रुग्णालय
एन ९५ मास्क हे १३७ रुपये तर थ्री लेअर मास्क हे १० रुपये प्रति मास्क या किमतीने विकत घेतले़ आहेत़ हे मास्क लाखोच्या घरात आहेत, असे सांगत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी जास्त माहिती देण्यास नकार दिला.

टीम लोकमत : राजाराम लोंढे - कोल्हापूर, सुमेध वाघमारे - नागपूर, संतोष हिरेमठ - औरंगाबाद, धनंजय रिसोडकर - नाशिक, प्रवीण खेते - अकोला, साहेबराव नरसाळे - अहमदनगर, निलेश राऊत व निनाद देशमुख - पुणे, हरी मोकाशे - लातूर, आनंद सुरवडे - जळगाव, चंद्रकांत सोनार - धुळे, शितलकुमार कांबळे - सोलापूर, अनंत जाधव - सिंधुदुर्ग

Web Title: coronavirus: ‘Lokmat Operation Mask’: 14 rates for a single mask in 14 districts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.