CoronaVirus Lockdown News thackeray government might ease restrictions after traders agiatations | CoronaVirus Lockdown News: व्यापारी रस्त्यावर येताच सरकारचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेत!

CoronaVirus Lockdown News: व्यापारी रस्त्यावर येताच सरकारचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेत!

मुंबई/नागपूर : ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत व्यापारावर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची जोरदार मागणी करत सलग दुसऱ्या दिवशी राज्यात विविध ठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे येत्या दोन दिवसांत काही निर्बंध शिथिल करण्याचे किंवा त्यात सुटसुटीतपणा आणण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यापारी संघटनांबरोबरच्या बैठकीत दिले. त्यामुळे दोन दिवसांत व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. 

दरम्यान, नागपूर, अकोला, औरंगाबाद, ठाणे, पुणे, जळगाव आदी ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरून निदर्शने केली. व्यापाऱ्यांनी सरकारला शुक्रवारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. कोरोनाचा संसर्ग केवळ व्यापार सुरू ठेवल्यामुळे वाढतो काय, असा सवालही व्यापाऱ्यांनी केला आहे. 

व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगतानाच आपण व्यापाऱ्यांच्या विरोधात असण्याचा प्रश्नच नाही, प्रश्न लोकांचे जीव वाचविण्याचा आहे आणि त्यासाठी मला व्यापाऱ्यांचे सहकार्य हवे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सामूहिक आत्मदहनाची मागितली परवानगी
सहनशीलता संपली असून, दुकान उघडण्याचे आदेश जाहीर करा किंवा व्यापाऱ्यांना सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी द्या, असे निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांनी दिले.

व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
लॉकडाऊनऐवजी स्लो-डाऊन करा. खासगी कार्यालये, सरकारी कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवा.
व्यापारी प्रतिष्ठानांवरील गर्दी टाळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ती उघडी ठेवण्याची अनुमती द्या, म्हणजे मर्यादित वेळेत ती सुरू असल्याने होणारी गर्दी टाळता येईल.

खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन मी यापूर्वीच केलेले आहे. खरेतर, दुकाने चोवीस तास उघडी ठेवा, असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही दुकाने बंद करणे हा हेतू नाही, तर गर्दी टाळणे हा आहे.
    - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

मला दोन दिवसांचा वेळ द्या, मी काही निर्णय घेतो. मात्र, कोरोनावर मात करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपलीही जबाबदारी आहे. आपण सगळे मिळून कोरोनाचा मुकाबला करू या, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे दोन दिवसांत व्यापार क्षेत्राला काही दिलासा मिळेल, असा विश्वास आहे.
- बी. सी. भरतिया, राष्ट्रीय अध्यक्ष, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स

व्यापाऱ्यांचे आजचे आंदोलन मागे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी गुरुवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत सकारात्मक घोषणा करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले. त्यानंतर ‘फॅम’ने (व्यापारी महासंघ) आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले.

उपजीविकादेखील महत्त्वाची 
‘जीवाबरोबरच उपजीविकादेखील महत्त्वाची आहे, सध्या ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत आणलेल्या निर्बंधांमुळे व्यापार क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. पुढे सणवार आणि लग्नसराई आहे, व्यापार खुला राहिला पाहिजे, अशी भावना व्यापारी संघटनांच्या नेत्यांनी बैठकीत व्यक्त केली. 

ऑनलाइन सेवा वगळली
मुंबईत सोमवारपासून कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, ऑनलाइन पद्धतीने मागविलेले जेवण व अत्यावश्यक पुरवठ्याची घरपोच सेवा २४ तास सुरू राहणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Lockdown News thackeray government might ease restrictions after traders agiatations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.