डॉक्टरांचं बोट बाळाने घट्ट धरलं, अन्...; कोरोनाच्या काळातली अलिबागमधील मनाला भिडणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 20:58 IST2020-04-10T20:54:08+5:302020-04-10T20:58:56+5:30
श्वेता यांचं सिजेरियन व्यवस्थित झालं; मात्र थोड्या वेळातच बाळ काळं-निळं पडलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

डॉक्टरांचं बोट बाळाने घट्ट धरलं, अन्...; कोरोनाच्या काळातली अलिबागमधील मनाला भिडणारी गोष्ट
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे देवाचा अवतार म्हणूनच पाहिलं जातंय. हे डॉक्टर, नर्स, स्वच्छता कामगार, पोलीस, प्रशासन अक्षरशः झपाटल्यागत काम करत आहे. त्यांच्याइतकंच, अन्य आजार झालेल्या रुग्णांना बरं करणारे फिजिशियन, प्रसूती आणि बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. कोरोनाला न डगमगता त्यांनी रुग्णसेवेचं व्रत सुरू ठेवलं आहे. अलिबागमधील डॉक्टरांनी अत्यंत कठीण प्रसंगात अशाच कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवलं आणि एका नवजात अर्भकाला जीवनदान दिलं.
श्वेता केतन पाटील यांना रात्री उशिरा अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. खरं तर, गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण झाले नव्हते. परंतु, श्वेता यांना वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ.वाजे नर्सिंग होममध्ये दाखल केलं. पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होत चालल्याचं लक्षात येताच, डॉ. चंद्रकांत वाजे यांनी सिजेरियन करायचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. तो निर्णयही योग्यच ठरला.
श्वेता यांचं सिजेरियन व्यवस्थित झालं; मात्र थोड्या वेळातच बाळ काळं-निळं पडलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉ. चांदोरकर यांनी तातडीनं बाळाला एनआयसीयू (Neonatal intensive care unit) मध्ये न्यायचा निर्णय घेतला. परंतु, लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कुठलंही वाहन मिळेना. बाळाची तब्येत अधिकच नाजूक होत होती. शेवटी, डॉ. चांदोरकरांनी दुचाकीवरूनच बाळाला आनंदी हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं. त्यांच्यासोबत बाळाची मावशीही होती. ती नर्स आहे. ते दोघं बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. लगेचच त्याला कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करण्यात आला. त्यामुळे धोका टळला आणि आता हे बाळ एनआयसीयूमध्ये सुखरूप आहे. डॉ. वाजे, डॉ. चांदोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळेच हे शक्य होऊ शकलं.
बाळाच्या तब्बेतीची फेरतपासणी करताना, डॉ. चांदोरकर यांच्या हाताचं एक बोट त्या बाळाने घट्ट धरलं होतं. एक मोठी लढाई बाळानं जिंकली होती. त्यामुळे त्या स्पर्शाने, कोव्हीड 19 मुळे निर्माण झालेल्या नकारात्मक, निराशाजनक वातावरणात डॉक्टरांना अक्षरश: गहिवरून आलं. तो स्पर्श त्यांना नवं बळ देऊन गेला.
(रायगड-अलिबागचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी शब्दांकन केलेल्या लेखाच्या आधारे...)