coronavirus : दिवसभरात राज्यात सापडले 394 कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा 6 हजार 817 वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 21:19 IST2020-04-24T21:12:27+5:302020-04-24T21:19:01+5:30
दिवसभरात ३९४ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधितांची राज्यातील संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे.

coronavirus : दिवसभरात राज्यात सापडले 394 कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा 6 हजार 817 वर
मुंबई – राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसागणिक अधिक गंभीर होते आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात ३९४ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधितांची राज्यातील संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३०१ जणांचा बळी गेला आहे. मुंबईतही शुक्रवारी १८९ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर ११ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, मुंबईतील कोरोना (कोविड-१९) रुग्णसंख्या ४ हजार ४४७ झाली असून मृतांची संख्या १७८ झाली आहे.
सध्या राज्यातील कोरोना (कोविड-१९) आजाराचा मृत्यूदर ४.४ टक्के आहे. राज्यातील मृत्यूंचे विश्लेषण केले असता, ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी आढळला आहे. विशेषतः २१ ते ३० वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे. ६१ ते ७० वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के आह. यामुळे ५० वर्षांवरील आणि अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे.
राज्यात शुक्रवारी झालेल्या १८ मृत्यूंपैकी ११ मुंबईतील असून पाच पुणे व २ मालेगाव येथील आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार १८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आजपर्यंत ९५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ जण घरगुती अलगीकऱणात असून ८ हजार ८१४ लोक संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.