corona virus : कोरोनाच्या भीतीने एकविरा देवीची चैत्र यात्रा रद्द ; परंपरेनुसार धार्मिक विधी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:06 AM2020-03-31T09:06:59+5:302020-03-31T09:13:22+5:30

महाराष्ट्रातील कोळी, आग्री, सीकेपी, सोनार समाज मोठ्या श्रध्देने गडावर विविध गावांमधून पालख्या घेऊन गडावर येतात.

corona virus : Ekvira devi chaitra festival is cancelled due to corona | corona virus : कोरोनाच्या भीतीने एकविरा देवीची चैत्र यात्रा रद्द ; परंपरेनुसार धार्मिक विधी होणार

corona virus : कोरोनाच्या भीतीने एकविरा देवीची चैत्र यात्रा रद्द ; परंपरेनुसार धार्मिक विधी होणार

googlenewsNext

लोणावळा : महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कुलस्वामिनी श्री एकविरा देवीची आज मंगळवारी (दि .३१) चैत्र सप्तमीला होणारी यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली असून पहाटे व सायंकाळी केवळ रिती रिवाजाप्रमाणे धार्मिक विधी केले जाणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तथा वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधिश स.अ.मुळीक व सचिव तथा तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली.
     महाराष्ट्रातील तमाम कोळी आग्री समाजाची कुलस्वामिनी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या श्री एकविरा देवीच्या यात्रा दरवर्षी कार्ला गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असते. षष्टीच्या दिवशी देवघर या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथाचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा, सप्तमीला कार्ला गडावर सायंकाळी सात वाजता वाद्यांच्या गजरात देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा व अष्टमीच्या पहाटे देवीचे तेलवन व मानाचा सोहळा पार पडतो. देवीचे हे तीन दिवस चालणारे सोहळे याची देही याचि डोळा पाहण्याकरिता महाराष्ट्र भरातून किमान पाच ते सहा लाख भाविद दरवर्षी गडावर येत असतात.

यात्रेच्या महिनाभर आदीपासून जिल्हा व तालुका प्रशासन तसेच वेहेरगाव ग्रामपंचायत देवस्थान समिती तयारी करत असते, येणार्‍या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता 24 तास देवालय सुरु ठेवण्यात येते. महाराष्ट्रातील कोळी, आग्री, सिकेपी, सोनार समाज मोठ्या श्रध्देने गडावर विविध गावांमधून पालख्या घेऊन गडावर येतो. राज्याच्या विविध भागातून किमान शंभर ते दिडशे पालख्या गडावर येतात, देवीच्या मानाच्या पालखी मिरवणूकीनंतर या पालख्यांची मिरवणूक काढली जाते.अतिशय देखणा व लक्षणीय सोहळा पाहण्याकरिता भाविक राज्याच्या कानाकोपर्‍यातून येत असतात. 
     यावर्षी मात्र कोरोना या महामारीच्या आजाराचे संकट सर्व देशवासीयांच्या डोक्यावर थैमान घालत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा विचार करता गडावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यातच केंद्र सरकारने 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केला तर राज्य सरकारने सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू केली. नागरिकांचे स्थलांतर रोखण्याकरिता सर्व जिल्ह्यांच्या सिमा बंद केल्याने यावर्षी कार्ला गडावरील श्री एकविरा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. देवीचे यात्रा काळातील सर्व धार्मिक विधी रिती रिवाजाप्रमाणे केले जाणार आहेत. इतिहासात प्रथमच देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. काल देवघरात देखिल भैरवनाथाचा पालखी सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये साध्या पध्दतीने झाला.

 सायंकाळी सात वाजता कापूर जाळून होणार आरती 

श्री एकविरा देवीची यात्रा व पालखी मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आला असल्याने महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांनी सायंकाळी सात वाजता आपआपल्या घराच्या खिडकी मध्ये कापूर पेटवत देवीची आरती करत सोहळा साजरा करावा असे आवाहन श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. राज्यावरील कोरोना संकटात सर्वांनी प्रशासनाला साथ देत सामाजिक बांधिलकी जपायची आहे. कापूरामध्ये जंतूनाशक शक्ती असल्याने तो घरात पेटविल्यास घरातील रोगराई निघून जाईल तसेच कापूराच्या उजेडाने सर्व परिसरात रोषणाई होईल व देवीची यात्रा साजरी केल्याचा आनंद मिळेल, याकरिता कोणीही घराबाहेर न पडता घरातूनच कापूर पेटवावा असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोळी, आग्री, सीकेपी, सोनार समाज मोठ्या श्रध्देने गडावर विविध गावांमधून पालख्या घेऊन गडावर येतात.     

Web Title: corona virus : Ekvira devi chaitra festival is cancelled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.