Corona virus : कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण निम्मेच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 09:52 AM2020-04-02T09:52:38+5:302020-04-02T09:57:49+5:30

कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के, तर महिलांचे प्रमाण ३६ टक्के

Corona virus : The coronara infection has about half the proportion of females than males | Corona virus : कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण निम्मेच

Corona virus : कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण निम्मेच

Next
ठळक मुद्देअहवालातून निष्कर्ष : वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाची माहिती

पुणे : मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने सुरू झाला. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के, तर महिलांचे प्रमाण ३६ टक्के असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीचे संकलन करून वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये ३१ मार्चपर्यंतची आकडेवारी समाविष्ट करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. भारतात जानेवारी महिन्यात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर महाराष्ट्रात ९ मार्च रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची राज्यातील  संख्या वाढत आहे. २३ मार्चपर्यंत राज्यात २१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये १३९ पुरुष तर ७७ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के, तर महिलांचे प्रमाण ३६ टक्के इतके आहे.
पुरुषांमधील धूम्रपान आणि मद्यपानाची सवय, नोकरीच्या निमित्ताने होणारा प्रवास, प्रवासामुळे तसेच कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी येणारा संपर्क अशी अनेक कारणे कोरोनास कारणीभूत ठरत असल्याचे मत वैद्यकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. मद्यपान आणि धूम्रपानामुळे श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि प्रतिकारशक्तीही कमी होते. त्यामुळे संसर्गाची शक्यताही वाढते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती ‘एक्स’ गुणसूत्राशी जास्त प्रमाणात संबंधित असल्याने महिलांना कोरोनाचा कमी धोका असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.
..........
आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६४ टक्के तर महिलांचे प्रमाण ३६ टक्केच आहे. काही तज्ज्ञांनी मांडलेल्या निष्कर्षानुसार, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती ‘एक्स’ गुणसूत्राशी संबंधित आहे. त्यामुळे महिलांना कोरोनाची आतापर्यंत तरी कमी प्रमाणात लागण झाली आहे. याशिवाय, पुरुषांमध्ये असलेली धूम्रपान, मद्यपानाची सवय श्वसनसंस्थेवर परिणाम करते आणि संसर्गाचा धोका वाढतो.- डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी.
.................
पुरुषांचे नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर जाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्कही जास्त असतो. म्हणूनच संसर्गाची शक्यता वाढते. सामाजिक स्वच्छतेबाबत महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जागृती कमी प्रमाणात असते. धोक्याकडे दुर्लक्ष करण्याची बेफिकिरी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे संसर्गाचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असू शकते.- डॉ. लीना बावडेकर 

Web Title: Corona virus : The coronara infection has about half the proportion of females than males

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.