Corona Vaccination: ३ दिवस पुरेल एवढाच साठा: राज्य; लसीचा कुठेही तुटवडा नाही: केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:35+5:302021-04-08T07:29:20+5:30

राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

Corona Vaccination state and center government makes allegation over vaccine stock | Corona Vaccination: ३ दिवस पुरेल एवढाच साठा: राज्य; लसीचा कुठेही तुटवडा नाही: केंद्र

Corona Vaccination: ३ दिवस पुरेल एवढाच साठा: राज्य; लसीचा कुठेही तुटवडा नाही: केंद्र

Next

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात लसीकरण देशात सर्वाधिक झालेले असून आता लससाठ्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत असून, लसीचा कुठेही तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

टोपे म्हणाले, राज्यात रोज सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची तयारी आहे. मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. राज्यात फक्त १४ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त तीन दिवस पुरेल. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख लसींची गरज आहे. तेवढी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही आज चार ते साडेचार लाख रुग्णांना डोस देत आहोत. ही क्षमता सहा लाखांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रात लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी परत पाठवावे लागले. आमची आधीपासून मागणी आहे की, लसीचा पुरवठा ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने करा; पण अद्याप तो झालेला नाही. लसीकरणात सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही टोपे म्हणाले.

ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. शेजारच्या राज्यातून ऑक्सिजन मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले.

अपयश झाकण्याचा प्रयत्न : डॉ. हर्ष वर्धन
आपले अपयश झाकण्यासाठी काही राज्ये लससाठ्याच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत. पुरेशा प्रमाणात लोकांचे लसीकरण न करता लसीचा तुटवडा असल्याचे भासवत लोकांमध्ये घबराट निर्माण केली जात आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांना फटकारले.

महाराष्ट्र शासनाने जाहीरपणे लसीचा तुटवडा असल्याचे स्पष्ट केले, याकडे लक्ष वेधत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, आपल्या अपयशाच्या सातत्यावरून लोकांचे लक्ष इतरत्र भरकटवण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. चाचण्यांची पद्धतही निकृष्ट आहे. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या बाबतीतही महाराष्ट्र शासनाची कामगिरी सुमारच आहे. वैयक्तिक वसुलीसाठी लोकांना संस्थात्मक विलगीकरणातून महाराष्ट्र शासन बाहेर पडू देत आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. एकंदरच राज्यावर एकामागोमाग एक संकटे येत असताना राज्याचे नेतृत्व मात्र झोपा काढत आहे, असेच दृश्य असल्याचे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.

रुग्णसंख्या पुन्हा १ लाखाच्या पुढे
कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा १ लाखाचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १ लाख १५ हजार ७३६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६३० जणांचा मृत्यू झाला. एकाच आठवड्यात दोनदा १ लाखाच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. सलग २८व्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे, तर रिकव्हरी रेटमध्येही घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

११ एप्रिलपासून कामाच्या ठिकाणीही लसीकरण
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ११ एप्रिलपासून १०० कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून हे आदेश दिले. 

Web Title: Corona Vaccination state and center government makes allegation over vaccine stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.