Corona Virus: तापमान वाढीनंतर कोरोनाचा प्रभाव होईल कमी; प्रतिबंधात्मक खबरदारीही गरजेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 04:15 IST2020-03-11T04:15:04+5:302020-03-11T04:15:28+5:30
शहरात नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्यासह नाक बंद होणे, डोकेदुखी, ऐकू न येणे, तसेच घसादुखीला सामोरे जावे लागत आहे.

Corona Virus: तापमान वाढीनंतर कोरोनाचा प्रभाव होईल कमी; प्रतिबंधात्मक खबरदारीही गरजेची
औरंगाबाद : जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू २८ ते ३० डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. हा विषाणू कपड्यांवर ९ तास, तर लोखंडी पृष्ठभागावर १२ तास जगू शकतो. राज्यात एप्रिलमध्ये तापामानाचा पारा ४३ अंशांवर जातो. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेने कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
शहरात नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्यासह नाक बंद होणे, डोकेदुखी, ऐकू न येणे, तसेच घसादुखीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबादेत गतवर्षी एप्रिलमध्ये ६१ वर्षांनंतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. कमाल तापमानाने ४३.६ अंश सेल्सिअस असा मोसमातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाची भीती दूर होईल. आगामी काही दिवस ढगाळ वातावरण राहील. उच्च तापमान या विषाणूसाठी मारक ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
वीस दिवसांपासून अडकून पडले
इराण व इराक येथील धार्मिक व पर्यटनस्थळांच्या सहलीसाठी आयोजक मुन्ना सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ४४ पर्यटक २१ फेब्रुवारीला तेहरानमध्ये दाखल झाले. पुढे इराकमध्ये प्रवेश बंद झाल्याने ते या ठिकाणी अडकून पडले आहेत. वीस दिवस उलटले तरी अद्याप त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग खडतरच झाला आहे. वृध्द पर्यटकांची औषधेही संपली आहेत.
तापमान वाढल्यानंतर या विषाणूचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे; परंतु एकमेकांपासून तो पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेतली पाहिजे. - डॉ. जी. एम. गायकवाड, सहायक संचालक, आरोग्यसेवा
कोरोनाचा विषाणू कपड्यावर ९ तास जिवंत राहू शकत असल्याचे सांगितले जाते. उन्हाळ्यात कोरोनाचे प्रमाण कमी होईल, अशीच शक्यता आहे. प्रतिबंधात्मक काळजी घेणे केव्हाही चांगले. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन, घाटी