Corona crisis persists; So celebrate this year's Shiva Jayanti in a simple way: Ajit Pawar | कोरोना संकट कायम; यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोरोना संकट कायम; यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांना सर्वच सण-उत्सव अगदी साधेपणाने व कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. तसेच अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेलं नाही. त्यामुळे पुढील काही काळ आगामी सण- उत्सव देखील साधेपणाने लागणार आहे. त्याच धर्तीवर यंदाची शिवजयंती सुद्धा साधेपणाने व उत्साहात साजरी करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुण्यात शिवजयंती उत्सव आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीत खा‌सदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

पवार म्हणाले, गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनांना नागरिकांनी कायमच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या काळात आलेले सर्व धर्मांचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करत समजूतदारपणा दाखविला. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारीची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला नेहमीप्रमाणेच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी शिवनेरीवर जाणार 

दरवर्षी राज्याचे प्रमुख शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी गडावर अभिवादनासाठी जाण्याची परंपरा आहे. यावर्षी सुद्धा कोरोनाचे संकट असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

शिवनेरी गडावर दर्जेदार विकासकामे 

शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. जिथे पुरातत्व विभाग, वन विभागाची परवानगी आवश्यक आहे तिथे परवानगी घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona crisis persists; So celebrate this year's Shiva Jayanti in a simple way: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.