कोरोनामुळे बदलली ‘आषाढी’ची समीकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 12:30 AM2020-05-24T00:30:35+5:302020-05-24T00:30:55+5:30

टाळी वाजवावी, गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची ।।

Corona changed the equation of ‘Ashadhi’ | कोरोनामुळे बदलली ‘आषाढी’ची समीकरणे

कोरोनामुळे बदलली ‘आषाढी’ची समीकरणे

Next

- स्वप्नील कुलकर्णी

पावसाळा सुरू झाला की, आषाढ महिन्यात सर्वांना पालख्यांचे वेध लागतात. ही आषाढी यात्रा हे वारकऱ्यांचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या पंढरीच्या विठुरायाला भेटायला येतात. हा अनुपम सोहळा याची देही, याची डोळा... पाहण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी भीमातीरी एकत्र येते.

मात्र, यावर्षी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. महाराष्ट्रातदेखील गंभीर परिस्थिती आहे. अनेक गावांतील यात्रा, उरूस तसेच जत्रा रद्द झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेलाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. वारी सोहळा होतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम थेट आषाढी यात्रेच्या पालखी सोहळ्यांवर झाला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पालख्यांचे विश्वस्त, वारकरी संप्रदायातील प्रमुख सदस्य यांची बैठक झाली. या बैठकीत यात्रेच्या एकूण नियोजनाबद्दल, बदललेल्या स्वरूपाबद्दल सविस्तर चर्चा झाली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारकरी प्रतिनिधींबरोबर चर्चा केली होती. वारीची असंख्य वर्षांची परंपरा खंडित होणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला होता. सदर नियोजन बैठकीत आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थानप्रमुखांनी तसेच उपस्थित अन्य सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेमध्ये आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थानप्रमुखांनी शासनासमोर तीन पर्याय ठेवले होते.

मात्र, दोन दिवसांपूर्वी सात प्रमुख पालखी सोहळ्यांमधील प्रमुख चार पालखी सोहळे रद्द झाल्याने आता माऊलीच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांनी शासनाला नवीन तीन प्रस्ताव दिले आहेत. ते असे,
१) श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणाºया प्रत्येक दिंडीतील एका वीणेकºयासह सुमारे ४०० वारकरी नेहमीच्या पद्धतीने श्री माऊलीच्या चल पादुका रथामध्ये विराजमान करून सर्व वैभवासह सोहळा पार पाडणे.
२) वारकरी एकंदर केवळ १०० व्यक्तींसह माऊलीच्या चल पादुका रथामध्ये विराजमान करून सर्व सोहळा पार पाडणे.
३) वारीची परंपरा खंडित होऊ नये, या दृष्टीने पायी प्रवास न करता श्री माऊलीच्या चल पादुका वाहनांमध्ये श्री क्षेत्र पंढरीस घेऊन जाऊन ३० व्यक्तींसह सोहळा पार पाडणे.

कोरोनाच्या संकटामुळे पालखी सोहळा नेहमीप्रमाणे न करण्याचा समजूतदारपणाचा निर्णय चार पालखीप्रमुखांनी घेतला आहे. नेहमीचा पालखी सोहळा रद्द करताना परंपरा चालू ठेवण्यासाठी काही पर्यायही या पालख्यांनी सरकारला दिले आहेत. त्यापैकी सरकार जी परवानगी देईल, त्यानुसार पालखी सोहळा करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. एकंदरीत, वारीची ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडित होऊ नये, हीच सर्वांची इच्छा आहे. याशिवाय, पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांसोबत व्हावा, पालखीने अतिशय साध्या पद्धतीने प्रस्थान ठेवावे, सोहळा वाटेत कोठेही दर्शनासाठी थांबणार नाही, प्रस्थान मंदिरांमध्ये होऊन पालख्या येथेच थांबतील, दशमीच्या दिवशी पादुका पंढरपूरला नेण्यात येतील, असे काही प्रस्ताव येत्या बैठकीत चर्चेस येण्याची शक्यता आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज तसेच इतर सर्व संतांच्या पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार का? त्याचे स्वरूप कसे? असे अनेक प्रश्न वारकरी, पोलीस व महसूल प्रशासन यांच्यापुढे असणार आहेत. या प्रश्नांची सर्वमान्य उत्तरे कोणा एका व्यक्तीकडे असतील, असे नाही. सर्व वारीचे योग्य रीतीने नियोजन केले, तर प्रथा-परंपरा यांचेही पालन व्यवस्थितरीत्या होईल तसेच प्रशासनावर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही. केवळ यासाठी सर्वांचा योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे, असे वाटते.
संतांचिया पायी माझा विश्वास ।
सर्वभावे दास जालों त्यांचा ।।
ते चि माझें हित करिती सकळ ।
जेगें हा गोपाळ कृपा करी ।।

वारकरी संप्रदायात आषाढी यात्रेला कुंभमेळ्याइतके महत्त्व आहे. यंदा आषाढी एकादशी १ जुलैला आहे. त्यासाठी परंपरेनुसार सुमारे तीन आठवडे आधी म्हणजे १२ जून रोजी देहू येथून संत तुकराम यांच्या, तर १३ जून रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल झाले असले, तरी राज्यातली कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या कार्यक्र मांच्या आयोजनावरचे निर्बंध आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेहमीसारखा सोहळा झाला नाही, तरी परंपरांमध्ये खंड पडू नये, अशी अपेक्षा वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी करत आहेत.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाºया शासकीय महापूजेलादेखील एक वेगळे महत्त्व असते. त्याचे स्वरूप कमी करता येऊ शकते. मुख्यमंत्र्यांसोबत आजी, माजी, मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पोलीस यंत्रणेवर मोठा भार पडतो. आषाढी यात्रा झाली, तर सर्वप्रथम हा लवाजमा कमी करावा लागेल.

सध्याची परिस्थिती पाहता सातपैकी चार पालख्यांचे पायी पालखी सोहळे रद्द झाल्याने यात्रा सोहळ्याचं नियोजन करत असताना वारीची समीकरणेदेखील बदलली आहेत. असे असले तरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांच्या या १८ दिवसांच्या प्रवासादरम्यान या संख्येमध्ये वाढ होऊ न देता योग्य ती काळजी घेतली, तर फार अडचण येणार नाही. यामध्ये संपूर्ण पायी पालखी सोहळ्यांतील वारकºयांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे.

प्रत्येक प्रमुखांनी आपापल्या पालखीतील तरुणांचा एक स्वतंत्र समूह तयार करावा. पालखीसोबत मोजकीच माणसे असल्याने त्यांची यादी सोबत घ्यावी. पालखी सोहळ्यातील लोकांची तसेच बाहेरील अनोळखी व्यक्ती पालखीत येणार नाही, याची काळजी घ्यावी. एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ... असे म्हणत एकमेकांना आधार देत, हा प्रवास केला तर आषाढी यात्रा संपूर्ण सफळ ठरेल, यामध्ये शंका नाही.
(लेखक मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

वारी हा आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कारच नसून मुक्तीतील आत्मानंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभवही आहे. मात्र, यावर्षी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. महाराष्ट्रातदेखील गंभीर परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख सात पालखी सोहळ्यांपैकी पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, मुक्ताबाई मुक्ताईनगर-जळगाव आणि सासवड येथील सोपानकाका यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे भक्तीच्या प्रेमसुखाला आपण मुकतो की काय? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. कोरोनामुळे आषाढीची समीकरणे बदलली असून वारीवर अनिश्चिततेचे सावट आहे. याबाबत, येत्या २९ मे रोजी आषाढीबाबत होणाºया बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालखीप्रमुख आणि पालखीशी संबंधित पदाधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली होती. तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारकरी प्रतिनिधींबरोबर चर्चा केली होती. वारीची असंख्य वर्षांची परंपरा खंडित होणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला होता. प्रस्थानाच्या दिवशी सरकारच्या नियमांत राहून श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल आणि दशमीपर्यंत पालखी सोहळा पैठणमध्ये नाथांच्या जुन्या वाड्यापासून दिंडी समाधी मंदिरात दशमीपर्यंत मुक्काम करेल. कमीतकमी पाच लोकांना सरकारने परवानगी दिली, तर पायी सोहळा पूर्ण करू आणि दशमीला पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी, इतकीच आमची मागणी आहे.
- रघुनाथ महाराज गोसावी, एकनाथ महाराज पालखी सोहळा

Web Title: Corona changed the equation of ‘Ashadhi’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.