पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:40 IST2025-07-21T08:39:46+5:302025-07-21T08:40:34+5:30

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे.

Controlling Pollution with Municipal Aid: Maharashtra's Strategy for Cleaner Air | पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!

पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!

डॉ. अविनाश ढाकणे
सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. समितीच्या  बैठकांमध्ये प्रदूषण कसे होते? का होते? त्यावर उपाय काय? याची चर्चा होते, प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. सूचनाही केल्या जातात. त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी महामुंबईमधील इतर प्राधिकरणांच्या मदतीने सुवर्णमध्य साधला जात असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

प्रदूषणकारी घटक कोणते आहेत?
उत्तर :
मुंबईत पीएम १०चे प्रमाण कमी आहे. दोन ते तीन वर्षांचा विचार करता २०२४ हे वर्ष २०२३  च्या तुलनेत चांगले होते. २०२५मध्ये जानेवारीपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढले. याचे कारण प्रदूषण करणारे घटक वाढले आहेत. वाहनांची संख्या, बांधकामे वाढत आहेत. सार्वजनिक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, पुलांची कामे सुरू आहेत. त्यातून निघणारे घटक प्रदूषण वाढवत आहेत.  

प्रदूषण कमी कसे करणार?
उत्तर :
मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण जास्त आहे. धूलिकण, वाहनांचा धूर, जाळण्यात येणारा कचरा आणि अन्य घटकांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘क्लीन एअर प्रोग्राम’ तयार केला आहे. पावसाळ्याचे चार महिने प्रदूषण कमी असते. ऑक्टोबरपासून ते वाढू लागते. ऑक्टोबरमध्ये तापमानामध्ये बदल होतात. हवेची दिशा बदलली किंवा हवा स्थिर राहिली की प्रदूषणाचे प्रमाण वाढते. 

बांधकामस्थळी काय उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर :
मुंबई पालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण कक्ष सुरू केला आहे. बिल्डरांना बांधकामस्थळी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामस्थळी हवामापक केंद्र बसविण्याबरोबरच तेथे किती प्रदूषण होत आहे? हे दर्शविणारा बोर्ड बिल्डरांना लावण्यास सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करीत आहे. तसेच प्रदूषण पातळी मोजण्यासाठी राज्यात ५० नवी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

नियमउल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होते?
उत्तर :
बांधकामस्थळावरचा राडारोडा वाहून नेताना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे ५०० आरएमसी प्लांट (रेडीमिक्स काँक्रीट प्लांट) आहेत. त्यांना प्रदूषणाबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण कमी करणे ही सरकारची किंवा एका यंत्रणेची जबाबदारी नाही, तर सर्वसामान्यांचीही जबाबदारी आहे. कारण कुणी कचरा जाळत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहिजे.  

टीकाकारांना काय उत्तर द्याल?
उत्तर :
टीकाकारांनी टीका केल्याशिवाय आम्हाला अडचणी समजणार नाहीत. मात्र त्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- शब्दांकन : सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादक

Web Title: Controlling Pollution with Municipal Aid: Maharashtra's Strategy for Cleaner Air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.