"भाजपकडून सातत्याने गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ", उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत मंत्री-आमदारांची संतप्त भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:40 IST2026-03-23T13:38:00+5:302026-03-23T13:40:17+5:30
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे महायुतीत राजकीय संघर्षांची ठिणगी पडली. विधानसभा आणि विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली.

"भाजपकडून सातत्याने गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ", उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत मंत्री-आमदारांची संतप्त भूमिका
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीने महायुतीत राजकीय संघर्षाला तोंड फुटले. पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करत शिंदेसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यावरच प्रश्न उपस्थित केले. विधानसभा,विधान परिषदेत यावरून शिंदेसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे पडसाद उमटले. शिंदेसेनेच्या मंत्री आणि आदारांनी पायऱ्यांवर आंदोलन केले. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची आणि बडतर्फ करण्याची मागणी केली गेली.
शिंदेंनी मंत्री आणि आमदारांची घेतली बैठक
विधान परिषद आणि विधानसभेत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा मुद्दा शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी आक्रमकपणे मांडला. पोलीस अधीक्षकांचे निलंबन आणि बडतर्फ करण्याची मागणी केली गेली. विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहात गोंधळ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्री आणि आमदारांनी आपली खदखद बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार, मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्तेत असून मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी आहे. सातत्याने आमची गळचेपी होत आहे. आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका मंत्री-आमदारांनी एकनाथ शिंदेंसमोर मांडली. उपमुख्यमंत्री शिंदेही यावर नाराजी व्यक्त केली.
पोलिसांच्या आडून भाजपावर निशाणा
विधान परिषद आणि विधानसभेत हा मुद्दा मांडला. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी अप्रत्यक्षपणे भाजपालाच लक्ष्य केले. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याबद्दल गंभीर आरोप केले.
दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत शिंदेंसेनेने भाजपा आणि गृह खात्यावर टीका केली. याच मुद्द्यावरून विधान परिषदेत शिंदेसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचे दिसले. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याते निर्देश दिले.