संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:03 IST2021-07-08T12:01:46+5:302021-07-08T12:03:24+5:30
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतली.

संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश
मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी उद्योगचक्र थांबणार नाही यादृष्टीने नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. (Continue the industry cycle even in the third possible wave CM Uddhav thackeray orders the system)
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतली. मोठ्या उद्योजकांच्या बैठकी घ्या, तिसऱ्या लाटेत उद्योग थांबणार नाहीत असे बघा, कामगारांची राहण्याची व्यवस्था उद्योगाच्या आवारातच करता येईल का तेही बघा, असे मुख्यमंत्री म्हणाले. सावधगिरीची पावले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा, समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकीय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घ्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्व जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल, असे राजेश टोपे म्हणाले. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे तसेच टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.