“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:46 IST2025-05-28T15:45:46+5:302025-05-28T15:46:19+5:30
Congress Yashomati Thakur News: राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात, बोलतात, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी सत्यजित तांबे यांना प्रतिआव्हान दिले.

“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
Congress Yashomati Thakur News: एकीकडे विविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकांबद्दल अपशब्द वापरले तर ते नाशिकला आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू, काळे फासता आले नाही तर त्यांच्यावर दगडफेक करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. यावरून आता काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्यजित तांबे यांनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला.
राहुल गांधी यांना धमकी देणे सोपे नाही, असे कोणीही वायफळ बडबड करत असेल, तर खबरदारी आम्हाला घेता येते. आम्ही शांततेने वागणारी मंडळी आहोत. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गावर जाणारे आहोत. पण, आता कलयुग आहे, आम्हालाही कलयुगासारखे वागता येते. राहुल गांधी काहीच चुकीचे बोललेले नाहीत. इतिहासात जे लिहिले आहे, ते परत सांगत असतील, तर त्यात वावगे काय आहे? कोणी माफी मागितली, कोणी काय केले, हे इतिहासात आहे ना? इतिहास बदलू शकणार नाही. गांधी कुटुंबाला सर्वांत जास्त दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. अशा वेळेस राहुल गांधी यांना तुम्ही काही बोलत असाल, तर कुणी खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. यावेळी सत्यजित तांबे यांनी केलेल्या विधानाबाबत यशोमती ठाकूर यांना प्रश्न विचारण्यात आला.
सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी
सत्यजित तांबे हे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे, सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान मोदींना फोन लावावा. याशिवाय महाराष्ट्रातील कोणीही मोदींना फोन करावा. मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसेच बोलू शकतो, असे आव्हान ठाकूर यांनी दिले. तसेच राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात, बोलतात, समन्वय साधतात. प्रत्येक पक्षाचा आपापला प्रोटोकॉल असतो, तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केला, अलिप्त राहण्याचा विचार केला त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असा पलटवार ठाकूर यांनी केला.
दरम्यान, अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस हा देशातील विचार आहे, तो संपणार नाही. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. छातीठोकपणे सांगतो की, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधींची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला जाऊन दाखवावे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले होते.