शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:44 IST2025-10-22T17:43:18+5:302025-10-22T17:44:52+5:30
स्थानिक निवडणुकीआधीच महाविकास आघाडीतील बिघाडी जाहीरपणे उघड होत आहे.

शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
बुलढाणा - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस जाणार नाही असा दावा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. त्यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोखठोक भाष्य केले. शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे. ती भावना त्यांनी व्यक्त केली आहे असं सपकाळ यांनी म्हटलं.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सेना-मनसेसोबत जाऊ नये अशी नेते, कार्यकर्त्यांची भावना आहे. नेतृत्वासोबत बसून यावर चर्चा होईल. ज्याक्षणी निवडणूक जाहीर होईल तेव्हा याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
तर निवडणुका जवळ आल्याने सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आमदारांना पैसे वाटप केले जात आहे. विकासासाठी हा निधी दिला जात असेल तर स्वागतार्ह आहे मात्र निधीवाटप समान झाले पाहिजे. भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळे रान सत्ताधारी आमदारांना दिले जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारकडे पैसा आहे परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या पीडित शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. पैसा फेक, तमाशा देख अशी सत्ताधाऱ्याचे धोरण आहे असं सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, महेश कोठारे यांनी मोदींची भक्ती करावी, त्यांची आरतीही करावी. मात्र राष्ट्रीय मापदंडानुसार मोदींची भक्ती का करावी, त्यांनी बेरोजगारी वाढवली, भ्रष्टाचार वाढवला म्हणून आहे की ते फेकुगिरी करतात म्हणून आहे..यापैकी कुठल्या गुणांना भाळून ते मोदींची भक्ती करतात हे सांगावे. मानवी निर्देशांकात आपण मागे झालो आहोत. भूकबळीत आपल्या देशाचे नाव आहे. गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही अशी परिस्थिती असताना मोदींच्या भक्तीमागची त्यांची प्रेरणा काय हे महेश कोठारेंनी सांगायला हवे असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.