आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस करणार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:23 IST2018-06-04T18:23:06+5:302018-06-04T18:23:06+5:30
नुकत्याच आटोपलेला पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवरून भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेले वादविवाद अद्याप थांबलेले नाहीत.

आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस करणार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
मुंबई - नुकत्याच आटोपलेला पालघर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीवरून भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेले वादविवाद अद्याप थांबलेले नाहीत. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा आणि निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करत होती, असा आरोप करत या प्रकरणी मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाकडून वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि सत्तेचा दुरुपयोग केला गेला आहे. तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली काम करत होती का? अशी शंका निर्माण करणारी परिस्थिती संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दिसून आली. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली, नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिका-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी,दि. ५ जून रोजी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.