“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:13 IST2025-11-25T15:12:52+5:302025-11-25T15:13:25+5:30
Congress Vijay Wadettiwar: कुंभमेळ्यासाठी इतका खर्च केला जातो, यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. मत दिली नाही तर निधी देणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची खासगी संपत्ती आहे का? यांनी कमावलेली तिजोरी आहे का? सत्ताधारी जनतेला धमकावत आहे, गुंडगिरीचा भाषा वापरत असताना निवडणुका आयोगाला दिसत नाही का? अशा वक्तव्याची दखल निवडणूक आयोग घेऊन कारवाई का करत नाही, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
ऐन निवडणुकीत निधीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे. सत्ताधारी मतदारांना गृहित धरत आहे निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला आहे दुसरीकडे सरकारने कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी मंजूर केले आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे देण्याची वेळ आली की पैसे नसतात पण कुंभमेळ्यासाठी इतका खर्च केला जातो? यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते! कुंभमेळ्यासाठी झाड तोडली जाणार आहे, कुंभमेळा महत्वाचा की बळीराजा? शेतकऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.