“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:42 IST2025-11-27T19:39:35+5:302025-11-27T19:42:20+5:30
Congress Vijay Wadettiwar News: भविष्यात महायुतीतील तीनही पक्षातील बेबनाव समोर आलेला दिसेल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचू लागला असून, आता वादग्रस्त विधान अन् वार-पलटवारांनी राजकीय मैदान गाजू लागले आहे. नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत. नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच मालवण कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. राणे यांनी थेट भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरात मोठी रक्कम सापडली. महायुतीतील नेते एकमेकांवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावला आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही वस्तुस्थिती आहे की, भारतीय जनता पक्षा पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. भाजपाची ताकद नाही. केवळ पैशांच्या जोरावर सगळे सुरू आहे. महायुतीत मित्र पक्ष कसले राहिले. एक जण म्हणतो की, आम्ही रावणाचा अहंकार जाळून टाकू आणि दुसरा म्हणतो की आम्ही लंका जाळून टाकू. यावरून म्हणायचे तरी काय, अशी खोचक विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.
हे एकमेकांचे दीर्घकाळ टिकणारे साथीदार नाहीत
विषय असा की, जे आरोप-प्रत्यारोप राजकारणात केले जात आहेत. सत्तेत एकत्र राहायचे, सत्तेची मलई एकत्र खायची आणि स्थानिक निवडणुकांमध्ये एकमेकांशी भांडायचे. यावरून वाटते की, हे एकमेकांचे दीर्घकाळ टिकणारे साथीदार नाहीत. याची सुरुवात झालेली आहे. भविष्यात तुम्हाला या तीनही पक्षातील बेबनाव समोर आलेला दिसेल. उद्या मंत्रिमंडळात मारामारी झालेली आम्हाला पाहायला मिळू नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
दरम्यान, नीलेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. सुरुवातीला रविंद्र चव्हाण यांनी काढता पाय घेतला. परंतू, नंतर कारची काच खाली करून मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची असल्याचे वक्तव्य केले. यानंतरच यावर मी उत्तरे देईन, असेही ते म्हणाले.