“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:59 IST2025-12-05T15:59:04+5:302025-12-05T15:59:35+5:30
Congress News: नागपूरला हिवाळी अधिवेशनपेक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
Congress News: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या सरकारने अधिवेशनात आपल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. बियाणे खत मिळत नाही. मराठवाड्यात पूर आला यातून शेतकरी उद्ध्वस्त झाला. कुपोषित बालकांची संख्या वाढली. राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहे. बिल्डर आणि मंत्री संगनमताने राज्यातील कोट्यवधीच्या जमिनी बळकावल्या जात आहे. लाडक्या उद्योगपतींना लाभ मिळतो पण सामान्य जनतेला मात्र संघर्ष करावा लागत आहे. म्हणून या सरकारने एक वर्षात केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकार सत्तेत आले पण विधानसभा असो की विधान परिषद या सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. हे सरकार लोकशाही आणि संविधानाला मानत नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो पण सरकारला विरोधक नको, विरोध नको म्हणून ही पद रिक्त ठेवण्यात आली आहेत. नागपूर इथे हिवाळी अधिवेशनपेक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.