प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:00 IST2025-12-18T16:57:44+5:302025-12-18T17:00:21+5:30
Congress Vijay Wadettiwar News: प्रज्ञा सातव यांनी केलेला भाजपा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी हा धक्का वगैरे अजिबात नाही. त्यांचे संघटनेत फार योगदान होते असेही नाही, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.

प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
Congress Vijay Wadettiwar News: प्रज्ञा सातव यांनी केलेला भाजपा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी हा धक्का वगैरे अजिबात नाही. स्वार्थी लोक आहेत. खरे तर राजीव सातव गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली. काँग्रेसने सगळे दिले. राहुल गांधी यांचे सातव कुटुंबाशी भावनिक संबंध होते. असे सगळे होऊनही प्रज्ञा सातव असा कोणता निर्णय घेतील, असे वाटले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.
काँग्रेसचे नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सातव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
राजीव सातव यांच्या अर्धांगिनी म्हणून त्यांचा तेवढाच पक्ष संबंध होता
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष सोडून भाजपा प्रवेश करण्यात प्रज्ञा सातव यांचा नेमका काय स्वार्थ आहे, मला माहिती नाही. परंतु, आमदारकीची पाच वर्ष शिल्लक होती. असे असताना असा निर्णय घेतला गेला. आता काही अडचण होती का, त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. प्रज्ञा सातव यांच्यासोबतत फार कार्यकर्ते गेले असेही नाही. त्यांचे संघटनेत फार योगदान होते असेही नाही. राजीव सातव यांच्या अर्धांगिनी म्हणून त्यांचा तेवढाच पक्ष संबंध होता, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे. विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचे, असा प्रयोग त्यांना करायचा आहे. त्यामुळे कदाचित ती बाजू असू शकते. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसपासून दूर नेता येईल. विधान परिषदेत काही अट नव्हती. आमदार आमच्याकडे होते, या अधिवेशनात ते करू शकले असते, असेही वडेट्टीवार म्हणाले.