“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:27 IST2025-12-20T13:27:33+5:302025-12-20T13:27:33+5:30
Congress Vijay Wadettiwar: सरकारने SIT नेमली तरी ते पुरेस नाही. विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar: चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख घेतले होते, पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले. त्याची किडनी विकण्यात आली. असे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारने आज SIT नेमली तरी ते पुरेस नाही. शेतकऱ्यांना त्रास देऊन पैसे लुबाडणारे सावकारांचे रॅकेट आहे. विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ महायुती सरकारने आणली. हे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. किडनी विकणारे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सक्रिय असू शकते. यात डॉक्टर, एजंट असू शकतात याची चौकशी झाली पाहिजे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
निवडणूक आयोग भाजपची बी टीम असल्याचा आरोप
राज्यात नगरपरिषदेचे मतदान होत असले तरी अनेक ठिकाणी पैशाचे आमिष मतदारांना दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणूक आयोग हा भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. निवडणुकीत पाच हजार रुपयाची पाकीट वाटण्यात आली तर त्र्यंबकेश्वर येथील निवडणुकीत ५० हजार रुपये एका मताला देण्यात आले, कारण कुंभ येत आहे तिथे सत्ता हवी आहे, असा मोठा दावा करत, हे सगळे होत असताना निवडणूक आयोग झोपून आहे. काहीही कारवाई करत नाही म्हणून आयोग भाजपाची बी टीम असल्याचा आरोप वडेट्टीवर यांनी केला.
दरम्यान, भाजपाला उद्याच्या निवडणूक निकालात यश मिळेल, असा आत्मविश्वास हा बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावरच आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सदोष मतदार यादी असून याबाबत वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग काहीही करत नाही. भाजपाने निकालाची वाट न बघता गुलाल उधळला पाहिजे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.