“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:48 IST2025-12-04T18:42:30+5:302025-12-04T18:48:18+5:30
Congress News: ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Congress News: ईव्हीएम संदर्भात तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर निकालासाठी २० दिवस थांबायची वेळ का आली आहे? राज्यातील २६८ पैकी १७५ जागा भाजपाच्या येथील हे कशाच्या आधारावर बोलतात? तुम्ही कोणते दिवे लावले, ज्याने इतक्या जागा येईल? लाडक्या बहिणीच्या नावाचा वापर करून निवडून आले. ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे. जर भाजपाच्या १७५ जागा आल्या तर भाजपाने बेईमानी करुन, ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल, असा मोठा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
नगरपालिका निवडणुकीत प्रशासनाचा गोंधळ दिसून आला आहे. निवडणूक ईव्हीएम मशिनच्या स्ट्राँग रुमबाहेर अनेक ठिकाणी गडबड आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जॅमर लावा. रुमबाहेर मोठी स्क्रीन लावा, उमेदवाराला लाइव्हचे एक्सेस द्या. पण हे करायला निवडणूक आयोग तयार नाही, म्हणजे सरकारचा १७५ जागा मशिनच्या आधारावर जिंकणे हे टार्गेट आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
मतचोरी आणि मशीनच्या आधारावर सरकार बोलत आहे ना?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये इतक्या तक्रारी आल्या आहे. अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या, मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचे पुरावे तर सत्ताधारी आमदारांनी दिले, तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता जिथे ईव्हीएम ठेवण्यात आले तिथे सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज देत नाही, तिथे मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेले नाही, जिथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या त्या खोलीच्या बाहेर जॅमेर लावण्यात आलेले नाही. यातून मतचोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे. निवडणुका झाल्या आणि २६८ जागांपैकी १७५ जागा भाजपा जिंकणार हे कशाच्या आधारावर भाजपाचे नेते बोलत आहेत? मतचोरी आणि मशीनच्या आधारावर सरकार बोलत आहे ना? अशी विचारणा विजय वडेट्टीवारी यांनी केली.
दरम्यान, नागपूर इथे हिवाळी अधिवेशन हे तीन आठवडे चालणे अपेक्षित होते. या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळते याकडे लक्ष असते. पण आता निवडणुकीचे कारण दाखवून अधिवेशन सात दिवसात गुंडाळण्यात येणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे दुसरीकडे आचारसंहितेचे कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करू शकत नाही, त्यामुळे या अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पानचे पुसली जाणार, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.