२६ जानेवारीपासून काँग्रेस सुरू करणार ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:13 IST2025-01-13T15:13:33+5:302025-01-13T15:13:50+5:30
Congress News: काँग्रेसकडून २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहिम सुरु केली जाणार आहे.

२६ जानेवारीपासून काँग्रेस सुरू करणार ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’
मुंबई - राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी २६ जानेवारी २०२५ रोजी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान अधिक मजबूत करण्यासाठी २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहिम सुरु केली जाणार आहे. या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, सेल व विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून २६ जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महू येथे एक भव्य रॅलीने त्याची सांगता होणार आहे.