संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:56 IST2025-11-24T18:55:30+5:302025-11-24T18:56:47+5:30
Congress News: काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “शिवशंभू स्वराज्य मोहीम” राज्यभर राबवणार आहे.

संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’
Congress News: संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र, राज्यातील विविध संविधानवादी संघटना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “शिवशंभू स्वराज्य मोहीम” राज्यभर राबवणार आहे.
दि. २५ – २६ नोव्हेंबर २०२५ रोजी क्रांतीभूमी महाड – राष्ट्रमाता जिजाऊ समाधी स्थळ, किल्ले रायगड ही दोन दिवसीय मोहीम म्हणजे इतिहास, संविधान आणि सामाजिक न्याय यांच्या संगमाची एक अद्वितीय सामाजिक– राजकीय यात्रा आहे. महाडच्या क्रांती भूमीपासून रायगडाच्या स्वराज्यदुर्गापर्यंतचा हा प्रवास फक्त ऐतिहासिक स्थळांचा परिचय नाही तर आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाही, संविधान आणि सामाजिक सौहार्दाचे रक्षण करण्याचा सामूहिक जनसंकल्प आहे. या कार्यक्रमाची मुख्य थीम ही संत विचार, स्वराज्य, संविधान म्हणजेच “भारत जोडो” यात्रेच्या राष्ट्रीय संदेशाची महाराष्ट्रातील पुढील निर्णायक पायरी आहे. द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या भिंती पाडणे, प्रेम, बंधुता आणि सौहार्द बळकट करणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण, सर्व समाज घटकांना एकत्र आणून “संत–स्वराज्य–संविधान” ही त्रिसूत्री राज्यभर रोवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
संविधान दिनानिमित्त विशेष व्याख्यान
भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड. भाऊसाहेब आजबे व ॲड. संदेश कोंडविलकर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक व समन्वयक विश्वास उटगी यांनी दिली आहे.