Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षात तळागाळात काम करणा-या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून महत्वांच्या पदांवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. पक्ष संघटनेत नवे चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे.
ही निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कार्यक्षमतेवर आधारित असून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आली आहे. यामध्ये अकोला - ८, बुलढाणा - १९ , चंद्रपूर - २, जळगाव - ८, सिंधुदुर्ग - १, उल्हासनगर - १, रत्नागिरी - ६, ठाणे शहर - ३, ठाणे ग्रामीण - ५, अहिल्यानगर - ३, सांगली - २, पुणे - २, सोलापूर - १, अमरावती - २, धाराशिव - १, जालना - ७, हिंगोली - २, छत्रपती संभाजीनगर - ६, बीड - ३, यवतमाळ - १ अशा नियुक्त्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित नियुक्त्यांही लवकरच केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांनी दिली आहे.
पक्ष निरिक्षकांनी जिल्ह्यांचे दौरे करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निवड समितीच्या मुलाखतींनंतर या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निवड समितीत ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदींच्या समावेश आहे.