काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:59 IST2025-10-31T17:59:19+5:302025-10-31T17:59:55+5:30
Harshvardhan Sapkal News: आज एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, असा सवाल कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, असा सवाल कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, सकाळी एक पोलीस थेट बेडरूमध्ये घुसून टेहळणी करत होता, तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? पत्रकार आले आहेत का ?, यासह अनेक प्रश्न विचारले. तुम्ही बेडरुममध्ये प्रवेश का केला, कोणाचे आदेश आहेत, असे विचारले असता, वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगितले. अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे, आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले. आता थेट बेडरुमपर्यंत ते पोहचले आहेत परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, पवईत काल पोलिसांनी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीचे एन्काऊंटर केले. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्वाची होती पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी एनएसजीचे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय. तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असे सांगतिले जात आहे पण याच व्यक्तीने सुंदर माझी शाळा सारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
डॉक्टर संपदा मुंडे यांना दबावामुळे आत्महत्या करावी लागली, ही आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. निंबाळकर यांना अनेकांना त्रास दिला आहे, त्यांचा अपहरण, खंडणी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यात हात असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना क्लिन चिट देऊन टाकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या एका फुल व्रिकेत्यानेही भाजपाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून आपल्याला आत्महत्या का करावी लागत आहे हे सांगितले आहे. पोलिस सामान्य जनतेच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.सत्ताधारीच गुंडगिरी करत असल्याने कारवाई होत नाही. फडणवीस यांच्या काळात राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून यात भाजपाचे नेते पदाधिकारी यांची गुंडगिरी वाढली आहे. या सर्वांना फडणवीसच जबाबदार असून फडणवीस गुन्हेगारांचे आका आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला.