"वंदे मातरम्'ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवून दिली"; भाजपचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:34 IST2022-10-04T14:33:22+5:302022-10-04T14:34:11+5:30

स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचा हा अपमान असल्याचाही केला आरोप

Congress shows anti-national mentality by opposing Vande Mataram slams BJP | "वंदे मातरम्'ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवून दिली"; भाजपचे टीकास्त्र

"वंदे मातरम्'ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवून दिली"; भाजपचे टीकास्त्र

Vande Mataram, BJP vs Congress: सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावे, या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. 'वंदे मातरम्'ला विरोध करणारे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् म्हणत म्हणत फासावर चढलेल्या हुतात्म्यांचा एकप्रकारे अपमानच केला असून त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर बोलण्यास सुरूवात करताना हॅलो न म्हणता 'वंदे मातरम्' म्हणावे, या राज्य शासनाच्या निर्णयाला माजी मंत्री व कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला आहे. या संदर्भात बोलताना कुलकर्णी म्हणाले, "वंदे मातरम्' हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले सामान्य कार्यकर्ते 'वंदे मातरम्' म्हणतच फासावर चढले होते. बाळासाहेब थोरात यांना हा इतिहास माहीत नाही असे शक्य नाही. तरीही त्यांनी 'वंदे मातरम्'ला विरोध करणे हे तसे दुर्दैवीच आहे."

एकीकडे 'भारत जोडो' यात्रा, दुसरीकडे 'वंदे मातरम्'ला विरोध

"पंडित नेहरूंच्या पणतूच्या काळात कॉंग्रेसची राष्ट्रप्रेमाची व्याख्या कदाचित बदलली असावी. त्यामुळे 'भारत तेरे तुकडे होंगे' या सारख्या देशविरोधी घोषणा देणाऱ्या प्रवृत्तींना नेहरूंचे पणतू राहुल गांधींनी पाठिंबा दिला. एकीकडे 'भारत जोडो' म्हणत पदयात्रा काढायची आणि दुसरीकडे मात्र 'वंदे मातरम्'लाच विरोध करायचा यातून काँग्रेसचा दुटप्पी, ढोंगी चेहरा उघड झाला आहे, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले. देशविरोधी भूमिका घेतल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा त्यांना जनतेच्या संतापास सामोरे जावे लागेल, असा इशाराही भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिला आहे.

Web Title: Congress shows anti-national mentality by opposing Vande Mataram slams BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.