Sachin Sawant : "यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर…"; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 15:24 IST2022-12-18T15:12:19+5:302022-12-18T15:24:12+5:30
Congress Sachin Sawant slams BJP Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी लावलेल्या फेसशील्डचे फोटो व्हायरल होत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पाटलांना खोचक टोला लगावला.

Sachin Sawant : "यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर…"; काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडेल की फेसशिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही, एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) केले. चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. पाटील म्हणाले, कोणाला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. त्यांना घाबरून मी फेसशिल्ड लावली नाही तर माझ्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी मी फेसशिल्ड लावली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी लावलेल्या फेसशिल्डचे फोटो व्हायरल होत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी पाटलांना खोचक टोला लगावला आहे. "यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर अधिक हितकारक असेल असे वाटते" असं म्हणत निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "विचार तत्वाधिष्टीत असेल तर धैर्याची जोड आपसूकच मिळते. मग कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शाळा काढली तेव्हा चिखलफेकीचा सामना केला, पण पदराने ही तोंड झाकले नाही" असं म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. त्यावेळी तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस दलातही मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा शाई फेक करणार असल्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता. त्या पार्शवभूमीवर सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच पवना थडी जत्रेतही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"