“दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही, विधानसभेतही पराभव अटळ”: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:49 IST2024-07-18T16:48:46+5:302024-07-18T16:49:33+5:30
Congress Prithviraj Chavan: दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

“दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही, विधानसभेतही पराभव अटळ”: पृथ्वीराज चव्हाण
Congress Prithviraj Chavan: दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे. आज घोषणा केलेली लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय? घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या. योजना जाहीर करायच्या पण अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची? आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा का? राज्यावर आणखी किती कर्ज काढणार आहेत? या फक्त पोकळ घोषणा आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून अजित पवार पीडितांशी संवाद साधणार आहेत. हा दिखावा करणे महत्त्वाचे नाही. कृती करणे महत्त्वाचे आहे. राज्य पेटले तर त्याचा परिणाम उद्योग, नोकऱ्यांवर होईल. राज्यात सुरु असलेल जातीय ध्रुवीकरण थांबले पाहिजे. शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण स्पष्टपणे म्हणाले.
दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही
दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप, RSS चे धोरण आहे. आगामी विधानसभेत यांचा पराभव अटळ आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उद्योगधांद्याबाबत सरकार अधिवेशनात म्हणाले होते की, आम्ही श्वेतपत्रिका काढू. पण ती कधी काढणार त्यावर काहीच सांगत नाहीत. धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठा स्कॅम आहे, त्याचीही श्वेतपत्रिका काढू म्हणाले होते. पण ती निवडणुकीपूर्वी काढावी. या सगळ्या घोषणा मतांसाठी होत आहेत, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांसोबत आमच्या दोन बैठका आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे. चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.