महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:47 IST2025-07-30T11:47:42+5:302025-07-30T11:47:53+5:30
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत.

महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Congress: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंगळवारी पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल केले. पक्षाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीसाठी (MPCC) राजकीय व्यवहार समिती (PAC) स्थापन केली आहे. यासोबतच अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
रमेश चेन्निथला यांच्या खांद्यावर PAC ची जबाबदारी
काँग्रेस संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, महाराष्ट्र PAC चे नेतृत्व राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे आणि इतर अनेक अनुभवी नेत्यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. ही समिती पक्षाचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेईल आणि निवडणुकीच्या तयारीला दिशा देईल.
अनेक पातळ्यांवर नियुक्त्या
याशिवाय, राज्य युनिटमधील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेसने अनेक पातळ्यांवर नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाने १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, १०८ सरचिटणीस आणि ९५ सचिवांची नावे जाहीर केली आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर पक्षाला तळागाळात सक्रिय करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने ८७ सदस्यांची कार्यकारिणी देखील स्थापन केली आहे, जी राज्यभरात पक्षाचे कार्यक्रम, हालचाली आणि इतर उपक्रम राबवेल.
महाराष्ट्राव्यतिरिक्त, काँग्रेसने कर्नाटकमध्येही निवडणूकची तयारी सुरू केली आहे. पक्षाने तेथील निवडणूक प्रचार समितीसाठी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते एल. हनुमंतैय्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलांवरुन हे स्पष्ट होते की, काँग्रेस आता आगामी निवडणुकांच्या तयारीत पूर्णपणे गुंतली आहे. संघटनेतील या नवीन नियुक्त्यांमुळे तळागाळात पक्षाला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.