Nana Patole : "दहशतवाद, ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झालाय पण लोकशाहीत..."; काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:46 IST2022-08-17T13:39:13+5:302022-08-17T13:46:53+5:30
Congress Nana Patole Slams BJP Devendra Fadnavis : नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

Nana Patole : "दहशतवाद, ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झालाय पण लोकशाहीत..."; काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. "दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झाला आहे परंतु, लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहेत तसेच "देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला देशप्रेम शिकवायची गरज नाही, काँग्रेसच्या नसानसात राष्ट्रभक्ती सामावली आहे" असं देखील म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. "दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झाला आहे परंतु, लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही. दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भाजपा ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे असं म्हणत नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे.
"देवेंद्र फडणवीसांनी देशप्रेम शिकवायची गरज नाही"
"देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला देशप्रेम शिकवायची गरज नाही. काँग्रेसच्या नसानसात राष्ट्रभक्ती सामावली आहे. ज्यांचे राष्ट्रावर प्रेम नाही तेच मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी चुकीची विधाने करतात" असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील असं म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या घोषणेला अनेकांनी विरोध केला आहे. यानंतर आता काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना आपापसात भेटतांना व जनतेशी संवाद साधतांना 'जय बळीराजा' म्हणावं असं म्हटलं आहे.
भाजपाच्या 'वंदे मातरम्'नंतर काँग्रेसचं 'जय बळीराजा'; कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन
"बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे" असं म्हणत काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "राष्ट्रगीत - वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे, मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते - कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना व जनतेशी संवाद साधताना ‘जय बळीराजा‘ म्हणावे..." असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.