Nana Patole : "मुंबईत चालणे-बोलणे महाग होईल, अशा धमक्या देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 16:50 IST2022-09-13T16:42:47+5:302022-09-13T16:50:07+5:30
Congress Nana Patole : "राज्यातील दोन महिन्यातील हे प्रकार पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे याची कल्पना करवत नाही."

Nana Patole : "मुंबईत चालणे-बोलणे महाग होईल, अशा धमक्या देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद?"
मुंबई - राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार व आमदारच डोळे काढण्याची, हायपाय तोडण्याची भाषा करत आहेत. राज्य सरकारने अशा सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "भाजपाचे सरकार राज्यात आल्यापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांची गुंडगिरी वाढली आहे. "राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने लक्षात ठेवावे, जो अधिकारी हिंदू मुलांकडे वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत", अशा शब्दांत भाजपाचे आमदार धमकी देत असतील तर राज्यातील पोलीस अधिकारी काम कसे करतील. एका केंद्रीय मंत्र्यांनेही, मुंबई, महाराष्ट्रात चालणे बोलणे महाग होईल, असा इशारा विरोधी पक्षाला उद्देशून दिला. मुख्यमंत्र्यांच्या एका सरकारी आमदारानेच हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. हे कमी काय म्हणून अमरावतीमध्ये खासदार, आमदार राणा पती-पत्नी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालतात, सरकारी कामात हस्तक्षेप करतात. पोलीस आयुक्ताची बदली झाल्याचे आमदार महोदय स्वतःच जाहीरपणे सांगतात. दादरमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करतो हे काय चालले आहे, हा महाराष्ट्र आहे की उत्तर प्रदेश? राज्यात मोगलाई आली आहे का?" असा सवाल विचारला आहे.
"सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्याचे प्रकार गंभीर"
"राज्यातील दोन महिन्यातील हे प्रकार पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे याची कल्पना करवत नाही. महाराष्ट्राचा देशात नावलौकिक आहे, त्याला काळीमा फासण्याचे काम करू नका. सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहेत. आमदार, खासदार, मंत्रीच जर गावगुंडासारखे वागत असतील आणि सरकार त्यांना पाठीशी घालत असेल पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या या गुंडगिरीला मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी वेळीच आवर घालावा अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची वेळ विरोधकांवर येऊ देऊ नका", असेही नाना पटोले यांनी ठणकावले.