“मनोज जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत”; काँग्रेसचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 07:50 PM2024-02-28T19:50:51+5:302024-02-28T19:51:48+5:30

Congress Nana Patole News: मुख्यमंत्र्यांचा एक ओएसडी सतत जरांगेच्या संपर्कात होता, असा दावा करण्यात आला आहे.

congress nana patole big claims not manoj jarange bjp main target cm eknath shinde | “मनोज जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत”; काँग्रेसचा मोठा आरोप

“मनोज जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत”; काँग्रेसचा मोठा आरोप

Congress Nana Patole News: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वेगवेगळी वळणे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर विधानसभेतील चर्चेनंतर मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. यावरून महाविकास आघाडीसह अन्य विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. 

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा आणि आरोप शरद पवारांनी फेटाळून लावला. तसेच मनोज जरांगे यांनी राजकीय भाष्य करू नये, असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे आता भाजपा नेते आक्रमक झाले असून, मनोज जरांगे यांना आता माफी नाही, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे. यातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मनोज जरांगे केवळ निमित्त मात्र आहेत, भाजपाचे खरे टार्गेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असा आरोप केला आहे. 

मनोज जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीत जागा वाटपावरुन मोठा असंतोष व गोंधळ आहे, त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री अंतरावली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांना भेटले होते. त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहेत टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटना मजबूत आहे, काहीजण भितीपोटी पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ते व जनता काँग्रेसबरोबरच आहे. नांदेड जिल्ह्यातील तीनही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकारी सर्वजण काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचा असून लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार दिला जाणार असून विजयी होणार आहे, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. 
 

Web Title: congress nana patole big claims not manoj jarange bjp main target cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.