“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:04 IST2025-01-13T17:03:57+5:302025-01-13T17:04:26+5:30
Congress MP Praniti Shinde News: बीड प्रकरण विरोधकांनी लावून धरले असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला आहे.

“बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे
Congress MP Praniti Shinde News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केले. याचवेळी तिथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पोहोचले. त्यांनी समजूत काढल्यावर धनंजय देशमुख खाली उतरले. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. यातच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात टीका केली आहे.
विरोधकांनी हे प्रकरणच चांगलेच लावून धरले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने केली आहे. विरोधक या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. सगळी लोकं त्यांच्याविरोधात बोलत आहेत. तरीही काहीही होत नाही. त्या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड ते असूनही जर त्यांचे नाव येत नसेल तर त्यांना कुठेतर संरक्षण त्या मंत्रिपदाच आहे. ते फिल्मी स्टाइलने येतात आणि सरेंडर होतात. याचा अर्थ कुठेतरी संरक्षण आहे, हा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली.
बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत
सरकार या बाबतीत अजिबात गंभीर नाही. बीड,परभणीमध्ये दररोज नवे पैलू दिसून येत असून नवीन माहिती समोर येत आहे. तरीही मुख्यमंत्री याबाबतीत गंभीर नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री तो ही घेत नाहीत. त्यामुळे एकंदरीत हे सरकार निगरगट्ट झाले आहे, असे दिसून येत आहे. सुरेश धस अस म्हणाले की, जनावराला असे मारले तर अंगावर शहारे येतात, हे तर माणसाला मारत आहेत आणि हे अस बीड जिल्ह्यात पहिल्यांदा झाले नाही. बीड जिल्हा हा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हे सगळे प्रकरण झाकले गेले मात्र आता त्यांना हे भोगावे लागणार असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
दरम्यान, नैतिकता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आत्तापर्यंत ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकतेमुळेच दिले. आपण थोडावेळ बाजूला झाले पाहिजे. सुरेश धस म्हणाले की, चौकशी सुरु आहे तोपर्यंत मंत्रिपदासून बाजूला व्हा. क्लिन चीट मिळाली तर या परत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे. बजरंग सोनावणे यांची मागणी आहे. नैतिकता म्हणून लोकप्रितिनिधींनी राजीनामा दिला पाहिजे, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.